कोल्हापूर : राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी महाडिक यांच्या भाजपप्रवेशाविषयी चर्चा झाल्याचे समजते.
शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी महाडिक यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पावणेतीन लाख मतांनी पराभव केला होता. यानंतर दोन दिवस महाडिक कोल्हापुरात थांबून कार्यकर्त्यांना भेटले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेतली.
यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली असताना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांनी उलट काम केले याची संपूर्ण माहिती महाडिक यांनी पाटील यांना दिली. यानंतर ते मुंबईला रवाना झाले होते. आमदार अमल महाडिक हे देखील त्यांच्यासमवेत होते.
देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याआधी महाडिक बंधूंनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.सध्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार आणि सहा आमदार आहेत. भाजपचीही याच पद्धतीने ताकद वाढवण्याची गरज असल्याने महाडिक यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यांनी खासदारकीच्या काळात कोल्हापूरचे अनेक प्रश्न सोडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रवेशामुळे भाजप आणखी मजबूत होणार असल्याची मांडणी फडणवीस यांच्यासमोर करण्यात आल्याचे समजते. मात्र, महाडिक यांच्या पक्षप्रवेशाविषयी नेमका निर्णय काय झाला हे अधिकृतपणे कळू शकले नाही.