कोल्हापूर : धनंजय महाडिक कर्तबगार खासदार असून, त्यांनी अपयशाने खचून न जाता संकटावर मात करून विजय मिळविला. त्यांचे भविष्य मोठे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. दादा राज्यातील क्रमांक दोनचे नव्हे, तर क्रमांक एकचे ताकदवान मंत्री होणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.तंबाखू संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारणात शुभचिंतकांबरोबरच हितचिंतकांचा भरणा असतो. हितचिंतक आपल्या बरोबर राहून आपला काटा काढतात. डॉ. संजय पाटील यांचे त्यामुळे नुकसान झाले; पण आता काळजी करू नका. दादांसारखे ताकदवान मंत्री पाठीशी आहेत. काहीजण त्यांना क्रमांक दोनचे मंत्री म्हणत असले, तरी ते लवकरच क्रमांक एकवर जातील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.धनंजय महाडिक व संजय पाटील हे २००४ ला लोकसभेला उभे होते. दोघांनाही पराभव पत्करावा लागला. महाडिक यांना तर एका रात्रीत पराभूत करण्यात आहे. त्यानंतर त्यांच्या पेट्रोल पंपावर छापे टाकले; पण ते थांबले नाहीत. युवा शक्तीच्या माध्यमातून त्यांनी कामाचा डोंगर उभा केला, तरीही २००९ ला काही मंडळींनी दगा दिला. यालाही न घाबरता काम करून त्यांनी लढाई जिंकली. महाडिक यांचे भविष्य मोठे असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.तंबाखू संघाच्या कार्यक्रमात महाडिक, हाळवणकर, चंद्रकांतदादांकडून एकमेकांवर उधळलेल्या स्तुतिसुमनांची चर्चा जोरदार सुरू होती.आम्ही झाडू मारायचा का?
चंद्रकांतदादा क्रमांक एकवर जाणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगताच, आम्ही झाडू मारायचे का? असे आमदार सुरेश हाळवणकर यांनी महाडिक यांना उद्देशून म्हटले. यावर दादा पुढे गेले की तुम्ही त्यांच्याठिकाणी जाणार, तुम्ही दोनच भाजपचे आमदार आहात. त्यात अमल अजून लहान असल्याने तुम्ही काळजी करू नका, असे महाडिक यांनी सांगताच एकच हशा पिकला.भाजपच्या कामावर महाडिक खूश
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर स्तुतिसुमने उधळत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भाजपच्या जिल्ह्यातील कामावर आम्ही खूश आहोत. आपल्या कामावर जिल्हा समाधानी आहे.