कोल्हापूर : लाखो दूध उत्पादक व माता-भगिनींच्या कष्टाने राज्यासह देशभरात यशोशिखरावर पोहोचलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाला राजकीय हेतूने स्वार्थापोटी बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ही बदनामी इथून पुढे सहन केली जाणार नाही, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी आमदार सतेज पाटील यांना येथे दिला. यावेळी महादेवराव महाडिक यांच्यासह संचालक, उत्पादकांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
धडक निषेध मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित दूध उत्पादकांच्या जनजागृती मेळाव्यात हा सूर उमटला.खासदार महाडिक यांनी, ‘महाडिकांबरोबर वैरत्व असेल तर ते ‘गोकुळ’मध्ये कशाला आणता?’ अशी विचारणा करीत साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या संसारात माती कालवून त्यांच्या चुलीत पाणी ओतू नका, असा इशारा सतेज पाटील यांना दिला.
‘गोकुळ’ची बदनामी इथून पुढे जनता सहन करणार नाही; तसेच महाडिकांचीही वैयक्तिक बदनामी झाल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. सतेज पाटील हे आपल्या वडिलांच्या वयाच्या महादेवराव महाडिक यांच्यावर बदनामीकारक टीका करतात. जर आम्ही त्यांच्या वडिलांवर अशी टीका केल्यास ते त्यांना सहन होईल काय? अशी विचारणाही महाडिक यांनी केली.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दूध उत्पादक हेच दूध संघाचे खरे मालक असून, त्यांनीच संघाला यशोशिखरावर नेल्याचे सांगितले. १४ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या दूध संघाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून हा जनजागृती मेळावा घेण्यात आला, असे सांगून दूध संघाच्या कारभारावर टीका करणाºया सतेज पाटील यांचा त्यांनी आक्रमक शैलीत समाचार घेतला.
धनगर समाजाची १० एकर जागा बळकावून बावड्यात मेडिकल कॉलेज उभारले. त्यामुळे एका व्यक्तीने आत्महत्याही केली. त्याचबरोबर कदमवाडीत स्वत:चे हॉस्पिटल काढून ‘सीपीआर’ बंद पाडण्याचा घाट घातला. ‘सीपीआर’साठी येणारा निधी आपल्या मंत्रिपदाच्या काळात परत पाठविला; तर आपले हॉस्पिटल चालण्यासाठी या ठिकाणी पगारावर माणसे आणून झोपविली, अशा शब्दांत महाडिक यांनी पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी ‘गोकुळ’कडून गाईच्या दुधासाठी दिला जाणारा दर हा देशात सर्वांत जास्त असल्याचे सांगितले. चुकीच्या काळात दरवाढीची घोषणा सरकारने केली आहे. कुणाला तरी खूश करण्यासाठी संघांना तोट्यात ढकलण्याचे काम मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांनी केल्याची टीका त्यांनी केली. संचालक रणजितसिंह पाटील, अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई व दूध उत्पादक यांची भाषणे झाली.