कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपमध्येच मुख्य लढत होणार आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवार करुणा मुंडे या देखील निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी मंत्री धनंजय मुंडे व महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. कोल्हापुरात आज, शनिवारी पत्रकार परिषदेत घेत आपल्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.करुणा मुंडे म्हणाल्या, माझ्याबाजूने मतदारांचा कौल आहे हे लक्षात आल्याने मला मारण्याचा प्रयत्न झाला आहे. पुढील काळात माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर हल्ला झाला, काही बरे वाईट झाले तर मंत्री धनंजय मुंडे व महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरण्यात यावे. अशा कारवायांना न घाबरता मी निवडणूक लढवणार असा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर, आपल्याला महाराष्ट्र विकास आघाडीने पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, मी निवडून येणार या भीतीने मला निवडणूक लढवण्यापासून, प्रचार करण्यापासून रोखले जात आहे. प्रचार सुरु केला त्यावेळी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. इतक्या खालच्या पातळीवर हे राजकारण गेले आहे. इथे फक्त घराणेशाही आणि हुकुमशाही राबवली जात आहे. मोठमोठे नेते येवून सभा घेत आहेत, लाखो रुपये खर्च केले जात आहेत. माझ्याकडे एवढा पैसा नाही. अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात मी कायम लढत राहणार आहे.यापुढे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतदेखील उतरणार आहे. मी निवडून आले तर पगार आणि पेन्शन कोल्हापूर उत्तरच्या विकासासाठी वापरेन असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आण्णाराव पाटील यांनी करुणा मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला.
धनंजय मुंडे, महाविकास आघाडीकडून मला मारण्याचा प्रयत्न, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 6:07 PM