कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांना दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचाच प्रचार करावा लागेल व तो त्यांनी करावा यासाठी पक्षाचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी आज, शुक्रवारी येथे सांगितले. जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माझे राजकारणातील यश काहींच्या डोळ्यांत खुपत आहे, त्यामुळेच दक्षिण मतदारसंघात विरोधाचे राजकारण सुरू असल्याचा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी लगावला. प्रल्हाद चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीपेक्षाही जास्त राबून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचा खासदार निवडून दिला, हे त्यांनी विसरू नये. मंत्री सतेज पाटील यांनी शपथ घालून कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय केले होते. ‘दक्षिण’मध्ये सतेज पाटील यांनी पाठिंबा दिला नसता तर काय झाले असते, याचा विचार करावा. त्यामुळे काँग्रेसचे शिष्टमंडळ खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन तुम्ही ‘दक्षिण’मध्ये सतेज पाटील यांच्यासोबत राहून काँग्रेसचा प्रचार केला पाहिजे, असे आवाहन त्यांना करणार आहे.’मंत्री पाटील म्हणाले, ‘आपण नेहमीच काँग्रेसच्या विचाराने वाटचाल केली. लहान वयातच मंत्रिपदाची मोठी जबाबदारी मिळाली. कष्टाच्या व निष्ठेच्या जोरावरच आपल्याला पदे मिळाली; परंतु त्याचा काहींना पोटशूळ उठला. कमी वयात मिळालेली पदे काहींच्या डोळ्यांत खुपत आहेत. राजकारणातील यश हेच आपले शत्रू ठरत आहे. मी कुणाचे वाईट केले नाही. जर कुणाला माझी प्रगती बघवत नसेल तर तो माझा दोष नाही. मी काँग्रेसमुळेच मोठा झालो आहे. आपण कधीही काँग्रेसमध्ये राहून विरोधाची भूमिका घेतली नाही. मला वाईट करायचेच असते तर मंत्रिपदाच्या काळात जुन्या केसेस बाहेर काढल्या असत्या तर जे आता उभे राहायला निघाले आहेत त्यांना निवडणुकीत उभे राहू शकले नसते, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, माजी उपमहापौर विक्रम जरग, सरलाताई पाटील, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, किशोर खानविलकर, चंदा बेलेकर यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धनंजयना काँग्रेसचाच प्रचार करावा लागेल
By admin | Published: September 19, 2014 11:58 PM