कोल्हापूर : कोल्हापूर, कागलची भूमी लढाऊ आहे. समतेची भूमी आहे. या भूमीतील नेत्यांना पवार यांनी सर्व काही दिले. गोकुळ, केडीसीसी बँक दिली. काजू, बदाम बुट्टीने दिले. गांधीनगरमधून पाच मीटर शर्टाचे कापडही दिले. तरीही ईडीची चौकशी सुरू झाल्यानंतर भ्रष्टाचाराच्या पैशासह ते पळून गेले, अशी बोचरी टीका धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी मंगळवारी गैबी चौकातील सभेत केली.जानकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी राज्यात राजकीय घडामोडींमध्ये जंगलाला आग लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली. पवार यांना अनेक जण सोडून गेले. बिबट्याही गेला. त्यांच्या मागून तुमच्या (कागल) मतदारसंघातील आमदारही गेला.
जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, गद्दारी करून बाहेर गेलेल्यांनी यापूर्वी शरद पवार यांची अनेकांना भेट होऊ दिली नाही. कोण भेटते याची पाळत ठेवण्यासाठी लोक नेमले होते. भ्रष्टाचाराच्या जोरावर त्यांनी कुपेकर, माने, खानविलकर, नरसिंगराव पाटील अशा बहुजन नेत्यांची घराणी राजकारणातून संपविण्याचे काम केले. आता कागलमध्ये परिवर्तनाची लढाई सुरू झाली आहे.तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे २५ वर्षे आमदार झाले. मंत्री झाले. मात्र, ते स्वार्थासाठी बाजूला गेले. समरजीत घाटगे यांनीही दहा वर्षे आमदार झाल्यानंतर दिल्ली गाठावी. आमदार म्हणून दुसऱ्याला संधी द्यावी. राजेंद्र जाधव, अभिजित कांबळे, विश्वास देशमुख, रमीज मुजावर, सागर कोंडकर, यशवंत गोसावी यांची भाषणे झाली.
कम्पिल्ट घाबरलंय..सभेच्या ठिकाणी ‘घाबरलंय घाबरलंय.. कम्पिल्ट घाबरलंय’, ‘नको ईडी, नको गद्दार, आता समरजीतराजेच आमदार’, ‘गाडू या मंत्र्यांची गद्दारी, वाजवू या समरजीतराजेंची तुतारी’, ‘बदल हवा तर आमदार नवा’, ‘लय झाला हुकूमशाहीचा कारभार, आमदार होणार शाहूंचा वारसदार..’ अशा घोषणांचे फलक घेऊन महिला, कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले.
बालेकिल्ल्यात तोफ डागली..कागलमधील गैबी चौक हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला. त्यांना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीच्या अनेक सभा गाजवल्या. मात्र, आता मुश्रीफ यांच्या पराभवासाठी पवार यांनी गैबी चौकच निवडला. त्यांनी मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांच्यावर जोरदार तोफ डागली. त्यांच्या भाषणात मुश्रीफ यांचा संदर्भ येताच प्रेक्षकांतून प्रचंड दाद मिळत राहिली.