कोल्हापूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत (एस. टी.) समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी धनगर समाज क्रांतिकारी संघातर्फे रविवारी गजनृत्य करीत रॅली काढण्यात आली.‘यळकोट, यळकोट जय मल्हार,’ ‘ऊठ धनगरा, जागा हो; आरक्षणाचा धागा हो,’ अशा घोषणा देण्यात आल्या. कोल्हापुरातील गांधी मैदान येथून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, धनगर समाज क्रांतिकारी संघाचे अध्यक्ष विलासराव वाघमोडे, सुरेश शेंडगे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ झाला.धनगर समाजाच्या मागण्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मान्य न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या येथील निवासस्थानासमोर प्रतीकात्मक बिरदेव मंदिर उभारून सलग २४ तास धनगरी ढोल वाजवू, असा इशारा विलासराव वाघमोडे यांनी दिला.>धनगर समाजाची घटनेत अनुसूचित जमाती प्रवर्गात नोंद असून, त्यानुसार आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार सकारात्मक आहे. यासाठी आवश्यक असलेल्या पुराव्यांमधील त्रुटी दूर करून याबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करू.- चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री
आरक्षणासाठी धनगर समाजाची रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 3:42 AM