शिवरायांच्या काळापासून ते आजतागायत धनगर समाज डोंगरदऱ्या-खोऱ्यात राहत असून आजही हा समाज विकासापासून वंचित आहे. हजारो वन्यप्राण्यांचे हल्ले होत असून कोणतीही शासकीय मदत मिळत नसल्याने या समाजाला विविध सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. रस्ते, वीज, आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने धनगर समाजाला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी व शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कऱ्हाड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट सर्वतोपरी मदत करणार आहे, अशी ग्वाही ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे दिली.
चंदगड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील व जंगलात राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कऱ्हाडतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मनोहर बाजारी होते.
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कऱ्हाडतर्फे गेल्या ९ महिन्यांपासून सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे जिल्ह्यांतील आतापर्यंत १६४४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व ३० विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. चंदगड तालुक्यात एकूण १३ धनगरवाडे आहेत. त्यापैकी ४ धनगरवाड्यांतील एकूण ११० मुलांना शैक्षणिक मदत केली.
काजिर्णे, कानूर, कलिवडे व जंगमहट्टी धनगरवाडा येथे मदत केली आहे. याप्रसंगी प्रा. शंकरराव पुजारी, संजय कात्रट, देऊ यमकर, विठ्ठल शेळके, जगन्नाथ यमकर, रघुनाथ जानकर, लक्ष्मण शेळके, धोंडीबा येडगे, पृथ्वीराज बेडर, आदी उपस्थित होते.
-----------------------
फोटो ओळी : कलिवडे (ता. चंदगड) येथील धनगरवाड्यावर अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करताना प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शंकरराव पुजारी, संजय कात्रट, आदी उपस्थित होते.
क्रमांक :१५१२२०२०-गड-०५