सांगली : जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील वजनदार नेते म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील आणि कॉँग्रेस नेते आ. पतंगराव कदम यांना सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून क्लिन बोल्ड व्हावे लागले. दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांचे या निवडणुकीने चांगभलं केलं असून, जिल्ह्यात व पक्षीय स्तरावर त्यांचे वजन वाढले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील नेतृत्वाची स्पर्धा सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये लागली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, कॉँग्रेसचे पतंगराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख आदी नेते आघाडीवर होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही त्यांच्या मुलाच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दुसरीकडे शिवसेनेची व मतदारसंघातील स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी आ. अनिल बाबर यांनी शड्डू ठोकला होता. त्यामुळे या नेत्यांनी अस्तित्वाची लढाई पूर्ण ताकदीने लढली. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक धक्का पतंगराव कदम यांना बसला. सत्तेपर्यंत पोहोचणारा पक्ष म्हणून कॉँग्रेसची गणती केली जात होती. या पक्षाचे नेतृत्व सध्या पतंगराव कदम यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. याशिवाय कडेगाव आणि पलूस हे दोन तालुके पतंगरावांचे बालेकिल्ले समजले जातात. या दोन्ही तालुक्यात त्यांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी या दोन्ही तालुक्यात देवराष्ट्रे वगळता सर्व जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली. त्यामुळे पक्षीय स्तरावर त्यांचे वजन वाढले आहे. माजी मंत्री आ. शिवाजीराव नाईक यांनीही शिराळा तालुक्यातील लढाई प्रतिष्ठेची केली होती. याठिकाणी त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. याशिवाय त्यांचे पुत्र सत्यजित नाईकही पराभूत झाले. जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटेकरी झाल्यास नाईक यांना मंत्रीपद दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे शिराळ््यातील पराभव नाईकांना धक्का देणारा ठरला. आटपाडीत राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपच्या पारड्यात तालुक्यातील सर्व जागा टाकल्या. त्यामुळे पक्षातील त्यांचा दबदबाही वाढणार आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना कवठेमहांकाळ तालुका वगळता अन्यत्र यश मिळाले नाही. (प्रतिनिधी)खासदारांना धक्काभाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना तासगाव आणि कवठेमहांकाळ या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात धक्का बसला. तासगाव तालुक्यात दोनच जागा त्यांच्या पदरी पडल्या. कवठेमहांकाळमध्ये त्यांना खातेही उघडता आले नाही. भाजप सत्तेकडे वाटचाल करीत असतानाही संजयकाका आणि आ. नाईक यांचा व्यक्तिगत ‘फरफॉर्मन्स’ चांगला झाला नाही. मिरज, जतमधील नेत्यांना यशजतचे आ. विलासराव जगताप आणि मिरज तालुक्यातील आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांनीही तालुक्यात जोरदार ताकद लावली. या दोन तालुक्यांमध्येच १३ जागा भाजपच्या पदरात पडल्याने दोन्ही तालुक्यातील नेत्यांचे पक्षाच्या राज्यदरबारी वजन वाढले आहे. जिल्ह्यातील या नेत्यांची निराशाजनक कामगिरीकॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात एकही जागा निवडून आणता आली नाही. दादा गटातील प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनी ताकद पणाला लावूनही मिरज तालुक्यात त्यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनाही वाळवा तालुक्यात फार यश मिळाले नाही. त्यांचे पुत्र वैभव शिंदेही निवडणुकीत पराभूत झाले.
पतंगरावांना धोबीपछाड, जयंतरावांना धक्का
By admin | Published: February 23, 2017 10:50 PM