कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १९ पैकी तब्बल १३ ठिकाणी दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे आमदार अमल महाडिक यांना धोबीपछाड दिला. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाचगाव ग्रामपंचायतीत सतेज पाटील गटाने घवघवीत यश मिळवून बदललेल्या राजकारणाची चुणूक दाखवून दिली.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही आमदार पाटील यांची पीछेहाट झाली होती. ‘हुकमी’ म्हणता येतील अशा उचगाव व पाचगाव जिल्हा परिषदेत त्यांचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसला दोन जागा कमी पडल्या व त्याचा परिणाम काँग्रेसची जिल्हा परिषदेची सत्ता हातातून निसटली. त्या पराभवाचा वचपा पाटील गटाने या निवडणुकीत काढल्याचे चित्र दिसत आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निकाल फिरविण्याची ताकद असलेल्या पाचगाव व उचगाव या गावांत त्यांनी सरपंचपदासह सत्ताही काबीज केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकही लक्षवेधी होणार असल्याचे बीजारोपण निकालाने केले.पाचगावच्या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी सरपंचपदासह सदस्यपदाच्या १७ पैकी १५ जागा जिंकल्या.
उचगावमध्येही सरपंचासह सत्ता मिळवली. याशिवाय चुये, मोरेवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, दºयाचे वडगांव, नेर्ली, सरनोबतवाडी, कणेरीवाडी, कंदलगाव, हणबरवाडी, नागाव सरपंचपदासह ग्रामपंचायतींची सत्ताही पाटील गटाने खेचून घेतली. काही गावांत काँग्रेसच्याच दोन गटांत निवडणूक झाली आहे.शिरोलीतही केला पराभव..शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गावातही सतेज पाटील यांनी दोन खवरे बंधूंमध्ये मनोमिलन करून गावची सत्ताही आपल्याकडे खेचली. या गावात त्यांचे नेतृत्व मानणारे शशिकांत खवरे सरपंच झाले, तर ९ सदस्य जिंकून या ग्रामपंचायतीत सत्ता मिळवताना पाटील यांनी महाडिक गटाला चांगलाच शह दिला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच त्यांनी दोन खवरे गटांत समझोता घडवून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते; परंतु त्यावेळी त्यांना त्यात यश आले नव्हते.हा पराभव म्हणजे महाडिक गटाला मोठा धक्का मानला जातो.परप्रांतीय महाडिक हद्दपार..पुलाची शिरोलीच्या निवडणुकीत मूळच्या शिरोलीकरांनी परप्रांतीयांना अस्मान दाखविल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महाडिक यांना लगावला. ते म्हणाले, ‘सारा जिल्हा माझ्या ताब्यात आहे,’ असा आव आणणाºयांचा जनतेने त्यांच्या घरातच पराभव केला आहे. आपण काहीही केले तर लोक खपवून घेतात, याला ही चपराक आहे. महाडिकांच्या राजकारणाला ओहोटी लागल्याचेच शिरोलीकरांनी यातून दाखवून दिले आहे.