कोल्हापूर : जगभरातील सध्याची सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहता भारतातील अल्पसंख्याक समाजापुढे जास्त गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. समाजातील एका मोठ्या घटकावर अन्याय करणाऱ्या हुकूमशाही राजवटी येऊ पाहत आहेत, पण त्या जास्त काळ टिकत नाही, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर अकादमी आणि गाजिउद्दीन रिसर्च सेंटर (सोलापूर)च्यावतीने डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत हुमायून मुरसल यांना ‘प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सामाजिक कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, भारतीय राज्यघटनेने कलम २५ ते ३०मध्ये आणि धार्मिक अल्पसंख्याकांसाठी अनेक अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांचे संरक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे. सरकार कर्तव्य पार पाडत नसेल तर समाजाची, न्यायालयाची, राजकीय पक्षांची जबाबदारी आहे की, त्यांनी ही बाब सरकारच्या लक्षात आणून द्यावी.
प्रा. बेन्नूर यांच्या स्मृतींना उजाळा देत चौसाळकर यांनी म्हटले, बेन्नूर सर सातत्याने नव्या संदर्भात नवा विचार मांडणारे विचारवंत होते. ते मिळेल त्या ठिकाणी जाऊन विचार मांडत. त्यांचे जे विचार विविध माध्यमातून प्रकाशित आलेले आहेत. ते केवळ १० टक्केच आहेत. त्यांचे सर्वच विचार, लेखन, भाषणे प्रकाशित झाली पाहिजेत, असे चौसाळकर म्हणाले.
सन्मानाला उत्तर देताना हुमायून मुसरल म्हणाले, मुस्लिमांना शैक्षणिक मागासलेपणाचा सर्वांत मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत ज्ञाननिर्मिती करण्याचे आव्हान मुस्लिम समाजासमाेर आहे. नॉलेज सोसायटी बनण्यासाठी मुस्लिमांनी काम करायला पाहिजे, हे कार्य चळवळ आणि संस्थात्मक अशा दोन पातळीवर करावे लागेल. त्यासाठी मुस्लिम समाजातील विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, कार्यकर्त्यांनी एका व्यासपीठावर यायला हवे.
डॉ. युसुफ बेन्नूर यांनी प्रा. बेन्नूर यांचे लेखनकार्य, विचार पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करू असे सांगितले. गाजिउद्दीन रिसर्च सेंटरचे सरफराज अहमद यांनी प्रा. बेन्नूर यांचे कार्य पुढे घेऊन जाऊ, असे सांगितले. बेन्नूर यांचे विखुरलेले वैचारिक साहित्य संकलित करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन संयोजन समितीचे सदस्य कलीम अजीम यांनी केले.
०४०९२०२१-कोल-चाैसाळकर
फोटो ओळ : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर अकादमी आणि गाजिउद्दीन रिसर्च सेंटर (सोलापूर)च्यावतीने डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत हुमायून मुरसल यांना ‘प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सामाजिक कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात आला.