कोल्हापूर : अडत देण्यावरून भाजीपाला मार्केट अचानक बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या खरेदीदारांवर गुन्हे दाखल केले की नाही? अशी विचारणा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बाजार समितीला केली. शेतकऱ्यांवर दादागिरी करून त्यांची वाहने कोणी फोडत असेल तर तुम्ही काय करत होता, अशा शब्दांत त्यांनी समिती पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे समजते. कॅशलेस व्यवहाराबाबत आयोजित डिजिधन मेळाव्यासाठी राज्यमंत्री खोत कोल्हापुरात आले होते, त्यावेळी त्यांनी बाजार समिती पदाधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृह येथे बोलावून घेऊन मागील आठवड्यात झालेल्या भाजी मार्केट बंदची माहिती घेतली. भाजी मार्केट बंद पाडणारे खरेदीदार किती होते? अशी विचारणा करत बंदमुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, याची माहिती घेतली. बंद काळात खरेदीदारांनी शेतकऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडणे, फोडाफोडी करणे, याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल केले का? अशी विचारणा खोत यांनी केली. यावर सभापती सर्जेराव पाटील म्हणाले, गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांवर पोलिसांत तक्रार दाखल केलेली आहे. पोलिस बंदोबस्तात भाजी मार्केटमधील सौदे सुरू ठेवले. यावर कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचनाही खोत यांनी केल्याचे समजते. त्यानंतर खोत यांनी बाजार समितीमधील कॅशलेस व्यवहाराची माहिती घेतली. गूळ मार्केटमध्ये ९० टक्के, कांदा-बटाटा मार्केटमध्ये ६० टक्के, तर भाजीपाला-फळे मार्केटमध्ये ४० टक्के व्यवहार कॅशलेस सुरू असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले. यावेळी पणन व्यवस्थापक अनिल पोवार, शहर उपनिबंधक संभाजी निकम, करवीरचे सहायक निबंधक सुनील धायगुडे, मोहन सालपे, आदी उपस्थित होते.
खरेदीदारांवर गुन्हे दाखल केले का?
By admin | Published: March 16, 2017 12:26 AM