कोल्हापूर : स्वीकृत नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलेले उपकार ते एवढ्यात विसरले का? त्यांना काय-काय मदत केली, हे त्यांनी एकदा डोळे बंद करून आठवावे, असा टोला महापालिका पदाधिकाऱ्यांनी संयुक्त निवेदनात लगावला आहे. उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण, गटनेता शारंगधर देशमुख, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे व शिक्षण सभापती संजय मोहिते यांनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जयंत पाटील यांच्यासह सहा इच्छुक उमेदवारांनी आज, शनिवारी सायंकाळीच पत्रकार परिषद घेऊन गृहराज्यमंत्र्यांवर टीका केली होती व आमच्यापैकी ‘अजिंक्यतारा’वरून कितीजणांनी अंगारा नेला, हे जाहीर करण्याचे आव्हान दिले होते. त्याला या निवेदनाद्वारे प्रत्युत्तर देण्यात आले असून, यापुढे या सातजणांच्या कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर दिले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे,‘बी. जी. मांगले यांनी त्यांच्याकडील कर्ज कसे फेडले हे जाहीर करावे. पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून राजू माने ‘अजिंक्यतारा’वर येरझाऱ्या घालत नव्हते का...? विकासवाडीतील जमिनीचे काम व्हावे म्हणून प्रताप कोंडेकर सतेज पाटील यांना भेटत नव्हते का...? उद्योजक चंद्रकांत जाधव कितीवेळा पाटील यांच्याकडे समस्या घेऊन आले? असे अनेक प्रश्न आमच्या मनात आहेत. सतेज यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्यांवर टीका केली की ती वृत्तपत्रांत छापून येते व आपले नाव मोठे होते, हे जाणूनच ही मंडळी पाटील यांच्यावर टीका करीत आहेत. त्यांच्यावर टीका करण्यासाठी एकत्र आलेले विकासाच्या प्रश्नांवर आजपर्यंत एकत्र का आले नाहीत..? जनता नेहमी काम करणाऱ्यांच्याच मागे राहते, हे त्यांनी लक्षात ठेवावे.’
नगरसेवक जयंत पाटील उपकार विसरले का...?
By admin | Published: September 21, 2014 12:55 AM