कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील नियोजित सेवा संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला नियमानुसार देता येत नाही, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी सांगताच माजी खासदार राजू शेट्टी मंगळवारी चांगलेच आक्रमक झाले. नियम सर्वांना सारखाच लावायचा. मनमानी पद्धतीने कामकाज करायचे नाही. नाही तर बँकेची सगळी माहिती माझ्याकडे आहे, असा इशारा त्यांनी दिला. बँकेचे कामकाज एकदम नियमानुसार चालते तर ईडी काय चहा पिण्यासाठी बॅंकेत आली होती का ? अशी विचारणाही शेट्टी यांनी केली.आकिवाट येथील नियोजित विमलनाथ चौगुले सेवा सोसायटीच्या स्थापनेसाठी अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला जिल्हा बँक देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारपासून अकिवाटचे सरपंच विशाल चौगुले यांनी जिल्हा बँकेसमोर उपोषण सुरू केेले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी माजी खासदार शेट्टी, प्रा. जालंदर पाटील, वैभव कांबळे, बंडू पाटील, बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी ठिय्या मारून पाठिंबा दिला. शेट्टी यांनी बँकेचे अधिकारी माने यांची कक्षात जाऊन भेट घेतली. त्यांनी दाखला का देत नाही, असा जाब विचारला. त्यावेळी माने यांनी बँकेचे नियम आणि धोरण सांगितले. त्यानंतर शेट्टी यांनी आता आम्हाला दाखला नको, पण मला गेल्या सहा महिन्यांत किती सेवा संस्थांना अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला दिला याची माहिती द्या, अशी मागणी लावून धरली. माने यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवून ही माहिती देऊ असे सांगितले.संचालक मंडळ विद्वानांचे आहे, त्यांच्या पुढे ठेवा, पण किती दिवसांत माहिती मिळेल हे सांगा, अशी विचारणा केली. याचे उत्तर देण्यास माने टाळाटाळ करीत राहिले. त्यानंतर शेट्टी यांनी माहिती देण्यास चार, पाच की आठ वर्षे लागतील. हे सरकार असेपर्यंत तरी माहिती मिळेल का, अशी विचारणा केली. शेवटी माने यांनी दोन आठवड्यांत माहिती देतो, असे सांगितले. दोन आठवडे म्हणजे १३ जुलैला मी बँकेत येणार आहे. माहिती तयार ठेवा, असा दम शेट्टी यांनी दिला.
संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटलांचा नाच ठेवाराजकीय द्वेषातून अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला देणार नसाल तर राजकारण करीत बँकेत बसा. विद्वान संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटील यांचा नाच ठेवा, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.
बँक चोरांची आहे का ?चेहरा बघून बँकेचा कारभार करणार असाल तर आमच्या संस्थेच्या ठेवी, इतर पैसे द्या, आम्ही राज्य बँकेसोबत थेट व्यवहार करतो, असे शेट्टी यांनी सांगितले. यावर माने यांनी बँक शिखर बँक आहे, असे सांगितले. यावर खवळून शेट्टी म्हणाले, बँक चोरांची आहे का ? बँक कोणाच्याही मालकीची नाही. शेतकऱ्यांची आहे. शेतकरी सातबारा गहाण ठेवतो म्हणून कर्ज देता. उपकार करीत नाही.
यड्रावकरांचा इतिहास संस्था मोडण्याचाचशिरोळचे आमदार आणि बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर हेच राजकारण करून दाखला देण्यास अडथळा करीत आहेत. त्यांचा संस्था मोडीत काढण्याचा आणि बंद पाडण्याचाच इतिहास आहे. त्यांचे ऐकून बँक दाखला देत नसल्याची टीका शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.