आई-वडिलांना वेदना : कारण शोधण्याची पोलिसांना विनंती कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक-तीनमध्ये काल, रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या सुप्रिया कृष्णा पाटील (वय २४, रा. रिळे-बत्तीस शिराळा, जि. सांगली) हिच्या आत्महत्येपाठीमागचे कारण शोधा, अशी भावनिक विनंती तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना केली आहे. त्यानुसार नातेवाइकांसह वसतिगृहातील विद्यार्थिनींकडे पोलिसांनी आज, सोमवारी दिवसभर चौकशी केली. तिच्या मोबाईलमध्ये सीमकार्ड नसल्याने ती कोणत्या कंपनीचे सीमकार्ड वापरत होती, त्याची माहिती घेऊन त्यावरील कॉल डिटेल्स तपासण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी दिली. सुप्रियाने लिहिलेल्या नोटबुकमध्ये काही प्रेमाचे संदेश आढळून आल्याने प्रेमप्रकरणातून तिने हे कृत्य केले आहे का,या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. काल रात्री तिचे आई-वडील व नातेवाईक सीपीआरमध्ये आले. काही नातेवाइकांनी तिच्या वसतिगृहातील खोलीमध्ये येऊन पाहणी केली. मुलीचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सर्वकाही चांगले असताना तिने आत्महत्या का केली, याची चौकशी करा, अशी भावनिक विनंती तिच्या आई-वडिलांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांच्याकडे केली. शोकाकुल नातेवाइकांना अखेर पोलिसांनी सावरले. त्यानंतर शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह ताब्यात घेऊन गावी नेण्यात आला. त्याठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सुप्रियाच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी आज दिवसभर वसतिगृहातील मुलींकडे कसून चौकशी केली. तिच्या जवळच्या मैत्रिणींनाही विश्वासात घेऊन कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तिचा कोणी मित्र होता का? ती कोणाला भेटत होती? तिला फोन कोणाचे यायचे? तुम्हाला ती स्वत:बद्दल काही सांगत होती का? आदी प्रश्नांतून माहिती मिळविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. यावेळी चौकशीसाठी बोलाविलेल्या मुली बिथरून गेल्या होत्या. (प्रतिनिधी) रात्रभर मुली उपाशीसुप्रियाने दिवसा वसतिगृहातील खोलीमध्ये आत्महत्या केल्याने अन्य मुलींत भीतीचे वातावरण पसरले होते. जेवण न करता तिच्या आठवणीने वसतिगृहातील मुलींनी रात्र जागून काढली. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात वसतिगृहातील आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे.
‘सुप्रिया’ ने आत्महत्या का केली...?
By admin | Published: December 29, 2014 11:25 PM