इचलकरंजी : येथील शाहू हायस्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षात गणवेश वाटप व शॉर्ट फिल्मवर चौदा लाख १० हजार रुपये खर्च केले आहेत. याबाबत संबंधित विभागाकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यामुळे विरोधी सदस्यांनी नगराध्यक्षांची भेट घेवून चौकशी व कारवाईची मागणी केली.मुख्याध्यापक व विभागप्रमुख यांच्या माहितीत तफावत आढळले असून, साहित्यही दर्जेदार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खळबळ उडाली. त्यावर नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शिक्षण आणि व्यवस्थापन समितीची ५ जुलैला बैठक घेवून अनियमितता आढळल्यास कारवाईचे आश्वासन दिले.नगरपालिकेच्या ३० जूनला झालेल्या सभेत शाहू हायस्कूलमधील ३१८ विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य वाटप आणि शाळेशी निगडित शॉर्ट फिल्म बनविण्यासाठी चौदा लाख १० हजार रुपये खर्च केल्याचा विषय होता.
या विषयावर चर्चा सुरू असताना विरोधी नगरसेवकांनी या कामांबाबत माहिती विचारली असता प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे शुक्रवारी नगरसेवक सागर चाळके, शशांक बावचकर आणि प्रकाश मोरबाळे यांनी नगराध्यक्षा स्वामी यांची भेट घेतली. शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षण समिती व विभागप्रमुख यांच्यासमक्ष गणवेश आणि शालेय साहित्य खरेदीबाबतच्या निविदा, त्याची कागदपत्रे याबाबत विचारणा केली. त्यामुळे खळबळ उडाली.
मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी साहित्य वाटप केल्याचे सांगितले. तसेच खरेदीबाबत शिक्षण समितीकडे बोट केले. मात्र, मुख्याध्यापक आणि विभागप्रमुख यांच्यातील माहितीमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्यक्ष वितरण केलेल्या साहित्याचे नमुने मागवले. त्यामध्ये साहित्य हे दर्जेदार नसल्याचे स्पष्ट झाले.कोणतीही निविदा अथवा आवश्यक प्रक्रिया न राबविता साहित्य खरेदी केल्याचे उघडकीस आले. विरोधी सदस्यांनी हे साहित्य नगराध्यक्ष कार्यालयात जमा करून घ्यावे व या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी केली. त्यावर ५ जुलैला संयुक्त बैठक होणार आहे.