- विश्वास पाटीलकोल्हापूर : रेशन व आधार कार्डवरील तुमच्या किंवा वडिलांच्या नावात किरकोळ जरी फरक असेल, तर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार घेण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. नावात बदल असलेली व्यक्ती एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र ७२ तासांत करून द्यावे लागते. रुग्ण दवाखान्यात असताना त्यासाठी नातेवाईकांची तहसीलदार कार्यालयात तारांबळ उडते. त्यात जोडून सुट्टी आल्यास अडचणीत भरच पडत असल्याचे चित्र पुढे आले आहे. या योजनेतून दीड लाख रुपयांचे उपचार मोफत होतात.शुक्रवारी कोल्हापुरातील एका व्यक्तीच्या पोटात अचानक जोरात रक्तस्राव सुरू झाला. त्यांच्यावर एका खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांचा वैद्यकीय विमा नसल्याने नातेवाईकांनी महात्मा फुले जीवनदायी योजनेतून उपचार करण्याचा निर्णय घेतला. संबंधित रुग्ण त्यासाठी पात्र होता. त्यांचे केशरी रेशनकार्ड होते. परंतु रेशनकार्डवर वडिलांचे नाव ‘ज्ञानू’ होते व आधारकार्डवर ‘ज्ञानदेव.’ हा नावातील किरकोळ फरकही उपचार करण्यात अडथळा ठरला. रुग्णालयाने जीवनदायी योजनेतून प्रस्ताव मंजूर नाही झाला तर तुम्हाला १ लाख ५० हजार रुपये भरावे लागतील व ते भरण्याची आमची तयारी असल्याचे नातेवाईकांकडून लिहून घेतले.महात्मा फुले जीवनदायी योजनेतून उपचारकरताना नावात बदल असल्याने येणाऱ्या अडचणींच्या घटना वारंवार अनुभवास येतात परंतु आम्ही कुणावरही उपचार थांबवत नाही. त्यांना तोंडी परवानगी देऊन ७२ तासांत प्रतिज्ञापत्रासह अनुषंगिक कागदपत्रे देण्याची मुभा असते. त्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी आम्हाला कागदपत्रांची काटेकोर छाननी करणे भाग पडते.-सुधाकर शिंदे, राज्य समन्वयक,महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, मुंबई
नावात फरक असल्यास उपचारात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 2:49 AM