कागल : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व कागलचा शाहू समूह एकत्रितपणे बहुजन समाजातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतील, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
पुणे येथे या संस्थेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचा कृतिशील वारसा या विषयावर संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नर्रा, राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव डांगी, अविनाश जगताप, सीमा कांबळे, सतीश कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते. समरजित घाटगे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी प्रगतिशील विकसित समाजाचे स्वप्न पाहिले होते. शाहू समूहाने आणि डिक्की या दोघांनी हे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले. संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे म्हणाले, समरजित घाटगे यांनी डिक्कीच्या माध्यमातून दलित युवक-युवतींना यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी सहकार्य करणे ही गोष्ट आमच्यासाठी आनंददायी आहे.
पुणे येथे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने समरजित घाटगे यांचा सत्कार डॉ. मिलिंद कांबळे यांनी केला. यावेळी अविनाश जगताप, संजीव डांगी चित्रा उबाळे आदी उपस्थित होते.