कोल्हापूर : इमॅन्युअल इचिबेरीच्या एकमेव गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळ (अ)ने तुल्यबळ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा, तर श्रीधर परब, रोहित कुरणेच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने तुल्यबळ खंडोबा तालीम मंडळ (अ)चा पराभव करीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेची साखळी फेरी गाठली.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ (अ) व फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात शनिवारी सामना झाला. यात प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करीत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. ‘दिलबहार’कडून करण चव्हाण-बंदरे, जावेद जमादार, निखिल जाधव, सचिन पाटील, इमॅन्युअल इचिबेरी, तर ‘फुलेवाडी’कडून संकेत साळोखे, रोहित मंडलिक, शुभम साळोखे, अक्षय मंडलिक यांनी चांगला खेळ केला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात ५० व्या मिनिटाला इमॅन्युअल इचिबेरीने सचिन पाटीलच्या पासवर गोल नोंदवीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. शेवटपर्यंत याच आघाडीवर ‘दिलबहार’ने हा सामना जिंकत स्पर्धेची साखळी फेरी गाठली. सामन्यादरम्यान दोन्ही ‘सामनावीर’ म्हणून इचिबेरी (दिलबहार), लढवय्या खेळाडू संकेत साळोखे (फुलेवाडी) यांना गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळ (अ) संघाचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला खंडोबाकडून अजिज मोमीन, सुधीर कोटीकेला, विकी शिंदे, सागर पोवार यांनी; तर ‘बालगोपाल’कडून श्रीधर परब, रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, बबलू नाईक, सूरज जाधव यांनी चांगला खेळ केला. सातव्या मिनिटाला ‘खंडोबा’कडून सागर पोवार याने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ‘बालगोपाल’कडून श्रीधर परबने गोल करीत संघास १-१ असे बरोबरीत आणले.
उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आघाडी मिळविण्यासाठी अनेक चाली रचण्यात आल्या. त्यात ५२ व्या मिनिटास बालगोपाल संघास यश आले.त्यात बबलू नाईकने मारलेल्या कॉर्नर किकवर रोहित कुरणेने गोल करीत २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ऋतुराज पाटील, रोहित कुरणे, बबलू नाईक यांनी आघाडी वाढविण्यासाठी प्रयत्न केले; तर बरोबरी साधण्यासाठी ‘खंडोबा’कडून कपिल साठे, अजिज मोमीन, सुधीर कोटीकेला यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. त्यामुळे हा सामना बालगोपाल संघाने २-१ असा जिंकत साखळी फेरीत प्रवेश केला.आजचा सामनादु. ३.३० वाजता : पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)