कोल्हापूर : सुशांत अतिग्रे, जावेद जमादार, निखिल जाधव यांच्या गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळ (अ)ने पाटाकडील तालीम मंडळ (ब)चा; तर दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने शिवाजी तरुण मंडळाचा पराभव करीत ‘फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली.
शाहू स्टेडियमवर ‘साई’तर्फे सुरू असलेल्या स्पर्धेत गुरुवारी पहिला सामना दिलबहार (अ) व पाटाकडील (ब) यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांकडून आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन झाले. यात ३०व्या मिनिटाला दिलबहार (अ)च्या सुशांत अतिग्रे याने गोल केला. त्यानंतर ‘पाटाकडील’कडून रोहन कांबळे, संग्राम शिंदे, सुनीत पाटील, आकाश काटे यांनी सामन्यात बरोबरी साधण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, पूर्वार्धात त्यांना बरोबरी साधता आली नाही.
उत्तरार्धात दिलबहार (अ)कडून ४५व्या मिनिटाला जावेद जमादारने गोल करीत संघाचा दुसरा गोल नोंदविला. या गोलनंतर पाटाकडील (ब)कडून वेगवान चाली रचण्यात आल्या. मात्र, त्यांना यश आले नाही. ‘दिलबहार’कडून विकी सुतार, मोहसीन बागवान, अनिकेत तोरस्कर, करण चव्हाण-बंदरे, सनी सणगर यांनी आघाडी वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना पाटाकडील (ब)च्या बचावफळीमुळे यश आले नाही. ६५ व्या मिनिटाला पाटाकडील (ब)कडून प्रथमेश हेरेकर याने गोल करीत संघाची आघाडी २-१ ने कमी केली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये धोकादायक खेळीबद्दल दिलबहार(अ) संघास पाटाकडील(ब) च्या गोलक्षेत्रात पेनॅल्टी बहाल केली. यावर निखिल जाधवने गोल करीत सामना ३-१ ने संघास जिंकूनदिला.
दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ (अ) व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून पाटाकडील (अ)चेच वर्चस्व राहिले. पहिल्या मिनिटास पाटाकडील (अ)कडून ओबे अकीमने गोल नोंदवीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा तिसºया मिनिटास अकीमने गोल करीत संघाची आघाडी २-० अशी वाढविली. त्यानंतर सहाव्या मिनिटास ओबे अकीमच्या पासवर हृषिकेश मेथे-पाटीलने गोल करीत ३-० अशी भक्कम आघाडी निर्माण केली. गोल करण्याचा पाटाकडील (अ)च्या खेळाडूंचा वेग पाहता मोठी आघाडी घेण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, ‘शिवाजी’कडून आकाश भोसले, अक्षय सरनाईक व बचावफळीने चुरशीने सामना करीत मोठी आघाडी वाढविण्याचे मनसुबे उधळून लावले.
उत्तरार्धातही ‘पाटाकडील’कडून ओबे अकीम, हृषिकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील यांचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न शिवाजी तरुण मंडळच्या बचावफळीने हाणून पाडले. त्यामुळे मोठी आघाडी घेऊन सामना जिंकण्याचा पाटाकडील (अ)चा इरादा फोल ठरला. अखेरपर्यंत हीच गोल संख्या कायम ठेवत पाटाकडील (अ)ने सामना जिंकत विजयी घोडदौड कायम ठेवली.१७ वर्षांखालील फुटबॉल सामनेपहिल्या सामन्यात प्रॅक्टिस (अ)ने दिलबहार (ब)चा २-० असा, तर बालगोपाल तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचा २-० ने पराभव केला. गडहिंग्लज युनायटेड संघाने पाटाकडील (ब) संघाचा २-० गोलने मात केली. शिवाजी तरुण मंडळाने ‘संध्यामठ’वर ५-० अशी एकतर्फी मात केली.