कोल्हापूर : रोहित कुरणेच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळ (ब)चा ४-०ने, तर साईनाथ स्पोर्टसने अनुभवी संध्यामठ तरुण मंडळाचा ४-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिला सामना बालगोपाल व दिलबहार (ब) यांच्यात झाला. सामन्यांच्या प्रारंभापासून बालगोपाल संघाचे वर्चस्व राहिले. यात ११ व्या व २६ व्या मिनिटाला ‘बालगोपाल’कडून रोहित कुरणे याने गोल करीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ‘दिलबहार’कडून साईप्रसाद वडगावकर, मसूद मुल्ला, शुभम माळी, मंगेश ढवंग यांनी चांगला खेळ करीत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पूर्वार्धात यश आले नाही. उत्तरार्धात ४७ व्या मिनिटाला ‘बालगोपाल’कडून रोहित कुरणेने गोल करीत संघासह वैयक्तिक तिसरा गोल नोंदवीत सामन्यात हॅट्ट्रिक साधली.
७५ व्या मिनिटाला ‘बालगोपाल’कडून अभिजित आगळे यानेही गोल करीत संघाची आघाडी ४-० अशी भक्कम केली. याच गोलसंख्येवर सामनाही जिंकत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात अनुभवी संध्यामठ संघाला साईनाथ स्पोर्टसने ४-२ असे टायब्रेकरवर हरवत स्पर्धेची पुढील फेरी गाठली. संध्यामठकडून १५ व्या मिनिटाला सौरभ हारुगलेच्या पासवर आशिष पाटीलने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. ३९ व्या मिनिटास संध्यामठच्या खेळाडूकडून गोलक्षेत्रात अवैध खेळाचे प्रदर्शन झाले. त्यावर पंचांनी साईनाथ संघास पेनल्टी बहाल केली. यावर आशितोष मंडलिक याने गोल करीत संघास १-१ असे बरोबरीत आणले. उत्तरार्धात ४५ व्या मिनिटास साईनाथकडून सतीश खोत याने मिळालेल्या संधीवर गोल करीत संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
६२ व्या मिनिटास संध्यामठकडून स्वराज्य सरनाईकने मैदानी गोल करीत सामना २-२ असा बरोबरीत आणला. दरम्यान पावसाला सुरुवात झाली. तरीही दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. संपूर्ण वेळेत २-२ अशी बरोबरी झाल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यात साईनाथकडून ओंकार लायकर, सतीश खोत, आशितोष मंडलिक, वीरेंद्र जाधव यांनी, तर संध्यामठकडून आशिष पाटील, मोहित मंडलिक यांनी गोल नोंदविले. त्यामुळे हा सामना साईनाथ स्पोर्टसने ४-२ असा जिंकत स्पर्धेची पुढील फेरी गाठली. २२ मिनिटांचा खेळ पावसात झाला. यातच टायब्रेकरही घेण्यात आला.आजचे सामनेदु. २ वाजता : पाटाकडील (अ) विरुद्ध साईनाथ स्पोर्टस्दु. ४ वाजता : प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ) विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल संघ