कोल्हापूर : पिग्मी गोळा करून गतिमंद मुलाचे संगोपन करणारे दिलीप शंकरराव जाधव (६०) यांचा कीटकनाशक प्राशन केल्यामुळे शनिवारी सकाळी सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा केदार (२६, दोघे रा. चंद्रेश्वर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला दम लागत असल्याने सीपीआरमध्ये दाखल केले असता, शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. एकमेकांसाठी जगणाऱ्या बाप-लेकांचा असा करुण अंत झाला.
पिग्मी एजंट म्हणून काम करणारे दिलीप जाधव यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या दोन मुली विवाहित आहेत. केदार या गतिमंद मुलासह ते चंद्रेश्वर गल्लीत राहत होते. मुलाच्या आंघोळी-पाण्यापासून ते औषधोपचारापर्यंत सर्वकाही ते स्वत:च पाहत होते. उतारवयात गतिमंद मुलाला सांभाळताना त्यांची प्रचंड दमछाक सुरू होती. तरीही जणू काही मुलासाठीच त्यांचे जगणे सुरू होते. मुलाला सोबत घेऊनच ते सर्वत्र फिरायचे. त्यामुळे या बाप-लेकांमधील जिव्हाळा कुतूहलाचा विषय होता.
व्हीसेरा राखीवदिलीप जाधव यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांचा मुलगा केदार याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. व्हीसेराचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.