पन्हाळा : पन्हाळा येथील व्हॉलीबॉल खेळाचे जेष्ठ मार्गदर्शक आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते पन्हाळ्याचे आदरणीय व्यक्तिमत्त्व दिलीप श्रीधर जोशी (वय ६९) यांचे अल्पश: आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.पन्हाळ्यासारख्या लहान गावात व्हॉलिबॉल खेळाची जुनी परंपरा आहेच. त्या खेळाचा लौकीक नव्याने वाढविण्यासाठी जोशी सरांनी या खेळासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी राज्यस्तरीय संघात सलग नऊ वर्षे सहभाग घेतला आणि तीन वर्षे नेतृत्व केले. पन्हाळ्यात चार राष्ट्रीय, पंचवीस राज्यस्तरीय, सहा जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते.
पुणे येथे आणि नागपुर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय युथ स्पर्धेच्या आयोजनाच्या महत्वाच्या भुमिके बरोबरच २०१८ मध्ये पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया व्हॉलिबॉल स्पर्धेच्या तंत्र समितीचे प्रमुख तर त्याच वर्षी शिर्डी येथे झालेल्या मिनी राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणुन त्यांनी काम केलेखेळाव्यतिरिक्त स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये जोशी सरांनी उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल गुणवंत कामगार म्हणुन सन्मानित करण्यात आले होते.
पन्हाळा ऐज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे ते चेअरमन होते. गणित हा विषय त्यांच्या अत्यंत आवडीचा. पन्हाळ्यातील सर्वच मुलांना ते हा विषय शिकवत असत. ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. पन्हाळ्यावर त्यांच्या निधनाने सर्व व्यव्हार बंद ठेवण्यात आले होते.