लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सरकी तेलाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून, १४० रुपये किलोकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये घसरण दिसत असून, मेथी व पालकची पेंढी पाच रुपये झाली आहे. फळमार्केटमध्ये द्राक्षांची आवक वाढली असून, ३० ते ४० रुपये किलो दर राहिला आहे. काळ्या जम्बो द्राक्षांनी ग्राहकांना भुरळ घातली आहे.
सरकी तेलाच्या दरात वाढ होत आहे. किरकोळ बाजारात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली असून, १४० रुपये दर झाला आहे. तूरडाळीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. १०० ते ११० रुपये किलो दर राहिला आहे. हरभरा डाळ ६५, मूग १००, मूगडाळ १२० हे दर काहीसे स्थिर आहेत. ज्वारीची मागणी वाढू लागली तरी दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. दर मात्र तेजीत असून, चांगली मिरची ३०० ते ३५० रुपये किलोपर्यंत आहे. साखरेचे दर ३५ रुपयांवरच स्थिर राहिले आहेत.
भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. घाऊक बाजारात कोबी ३, तर वांगी १० रुपये किलो आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हिरवागार कोबीचा गड्डा मातीमोल विकावा लागत आहे. टोमॅटो, ढब्बू, घेवडा, कारली, भेंडी, वरणाचे दर कमी झाले आहेत. गवारी ४, तर भेंडी २३ रुपये किलोवर कायम आहे. गावठी काकडीची आवक वाढली आहे. उन्हाळा वाढू लागल्याने त्याला मागणी असली, तरी दर ४० रुपये किलो आहे.
फळ मार्केटमध्ये कलिंगडे, लिंबू, द्राक्षाची रेलचेल वाढली आहे. उष्मा वाढल्याने फळांची मागणीही वाढू लागली आहे. आवक चांगली असल्याने दरात फारशी चढ-उतार दिसत नाही.
‘हापूस’ची आवक वाढली
हापूस आंब्याची आवक वाढली असून, गेल्या आठवड्यात आठ बॉक्सची आवक होती. रविवारी कोल्हापूर बाजार समितीत १३० बॉक्स आले आहेत. दोनशे ते आठशे रुपये बॉक्सचा दर राहिला आहे.
फोटो ओळी : कोल्हापुरात रविवारी आठवडी बाजारात काळ्या मोठ्या द्राक्षांची आवक झाली. (फोटो-२८०२२०२१-कोल-बाजार) (छाया- आदित्य वेल्हाळ)