सागर शिंदे --दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील गायरान क्षेत्र हे कचरा डेपोचे ठिकाण बनले असून शेतकरी, जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. या प्रकाराबद्दल ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त केला जात आहे.कोल्हापूर-गारगोटी मार्गावरती दिंडनेर्ली-हणबरवाडी दरम्यान घाट रस्त्यात दिंडनेर्ली हद्दीत राजीव सहकारी सूतगिरणीजवळ गायरान क्षेत्र आहे. येथे सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायत यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. निसर्गरम्य परिसर मानवी हस्तक्षेपामुळे समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. आसपासच्या भागातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. रस्त्यालगतच गायरान क्षेत्र असल्याने गाडीतून जाता-जाता कचऱ्याची पोती टाकली जात आहेत. यामध्ये घरगुती कचऱ्याबरोबरच दवाखान्यातील वापरलेली सलाईन व औषधे, बाटल्या, इंजेक्शन सिरींज, मुदतबाह्य गोळ्या, सुया, ड्रेसिंगचे कापूस, तर सलून दुकानदार कापलेले केस, ब्लेड, आदी कचरा मोठ्या प्रमाणात टाकतात. शेतकऱ्यांबरोबर जनावरांनाही याचा त्रास होत आहे. कित्येकदा जनावरांच्या तोंडाला व पायाला काचा लागून जखमाही झाल्या आहेत. तसेच परिसरामध्ये जेवणावळीचे कार्यक्रम असतील तर ग्रामस्थ प्लास्टिक, कागदी पत्रावळी येथे आणून टाकतात. जनावरे चरत असताना या प्लास्टिक पत्रावळीही खातात. आता ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्याच्या बाजूलाच पाण्याचा छोटा ओढा आहे. या ओढ्यातही कचरा मिसळला जातो. हाच ओढा पुढे दिंडनेर्लीतील मुख्य ओढ्याला मिळतो. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते, तसेच ग्रामस्थांबरोबर जनावरांनाही याचा त्रास होेतो आहे.बाटल्या फोडण्याचे प्रकारकित्येक लोक रस्त्यावरून जाता-जाता कचरा पोत्यात भरून या वळणावर टाकून जातात. या परिसरात दारूच्या व औषधांच्या काचेच्या बाटल्याही फ ोडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र काचांचा खच उघड्यावर, गवतामध्ये झाला आहे. याचा नाहक त्रास मात्र जनावरे व ग्रामस्थांना होत आहे. त्यामुळे भागातील ग्रामस्थांनी सार्वजनिक जबाबदारीचे भान ठेवून स्वत:च कचरा टाकू नये, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून होत आहे. गायरान क्षेत्रात कचरा टाकत असताना कुणी आढळल्यास किंवा माहिती मिळाल्यास ग्रामपंचायतीमार्फ त सार्वजनिक ठिकाण विद्रूपीकरण कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.- सचिन तारदाळे, ग्रामसेवक
दिंडनेर्ली गायरान क्षेत्र बनले कचरा डेपो
By admin | Published: January 03, 2017 12:27 AM