आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२३ : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’प्रश्नी कागल येथील करवीरनिवासिनी अंबाबाई भक्त मंडळ व अंबाबाई पुजारी हटाओ संघर्ष समिती कागलतर्फे रविवारी सकाळी कागल येथील राममंदिर ते करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर अशी दिंडी काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून आंदोलकांनी ‘पुजारी हटवून पगारी पुजारी नेमावे’ अशी मागणी करत अंबाबाईला साकडे घातले.
कागल येथील राममंदिर येथून सकाळी ६:३० वाजता दिंडीस प्रारंभ झाला. राममंदिरापासून मार्गस्थ झालेली दिंडी गोकुळ शिरगांव, उजळाईवाडी, शिवाजी विद्यापीठ, सायबर चौक येथे आली. यावेळी आम आदमी पक्षाच्यावतीने दिंडीचे स्वागत करत सहभागी आंदोलकांना नाष्टा दिला. दिंडी पुन्हा अंबाबाई मंदिराकडे मार्गस्थ झाली. सायबर चौकातून ही दिंडी राजारामपुरी, शाहू मिल, पार्वती टॉकीज चौक, उमा टॉकीज चौक, आझाद चौकामार्गे छत्रपती शिवाजी चौक येथे आली. यावेळी आंदोलकांतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पुन्हा ही दिंडी भवानी मंडपामध्ये दाखल झाली.
यावेळी अंबाबाई पुजारी हटाओ संघर्ष समितीतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी महापौर आर. के. पोवार, डॉ. सुभाष देसाई, दिलीप देसाई, बाबा पार्टे, डॉ. जयश्री चव्हाण यांनी आंदोलकांचे स्वागत केले. सकाळी ११:४५ वाजता ही दिंडी घोषणा देत अंबाबाई मंदिरात पोहोचली. यावेळी आंदोलकांतर्फे अंबाबाई मंदिरातील पितळी उंबरा येथे अंबाबाईला पुजारी हटवून पगारी पुजारी नेमण्याबाबत साकडे घातले. यावेळी मंदिरात ‘पुजारी हटाओ’च्या नाऱ्यांनी परिसर दणाणला. १२:१५ वाजता ही दिंंडी अंबाबाई मंदिरास प्रदक्षिणा घालून विसर्जित करण्यात आली.
या दिंडीत संजय चितारी, इंद्रजित घाटगे, बंडा चौगले, सागर घाटगे, सागर कोंडेकर, आबा चव्हाण, सचिन घोरपडे,शकील जमादार, बंडू शिराळे, कृष्णा धनगर, बंडा बारड, राजू कतरे, संजय गोनुगडे आदी शेकडो कागलकर सहभागी झाले होते.
घोषणांनी दणाणला परिसर
‘आई अंबाबाईला पुजाऱ्यांच्या तावडीतून सोडव’, ‘पगारी पुजारी नेमण्याची सुबुद्धी देवस्थान समितीला दे’, ‘राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाचे पालन करावे’. ‘हटाओ हटाओ, पुजारी हटाओ’ अशा एक ना अनेक घोषणांनी अंबाबाई मंदिर परिसर दणाणून निघाला.