राजाराम लोंढेकोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीचे व त्यानंतरच्या वातावरणाचा आढावा घेण्यासाठी त्यांची टीम दोन्ही मतदारसंघांत तळ ठोकून आहे. येथील अहवाल गेल्यानंतर त्यानुसार जोडण्या लावल्या जात आहेत. सहकारी संस्था, साखर कारखान्यांच्या संचालकांना थेट संपर्क होऊ लागल्याने यंत्रणा कुठपर्यंत पोहोचली याचा अंदाज येत आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर कोल्हापुरातील दाेन्ही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विकास निधी बरोबरच त्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारीही मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली होती. त्यामुळेच दोन्ही ठिकाणी उमेदवारी बदलाबाबत मित्र पक्षांनी हट्ट धरूनही संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यावरच त्यांनी विश्वास टाकला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कोल्हापुरात येऊन त्यांनी अंदाज घेतला, अर्ज भरण्यासाठी ते आलेत. दोन्ही मतदारसंघांत रात्रभर गाठीभेटी घेतल्यानंतर कोणत्या दुरुस्त्या करायला पाहिजेत, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे.पक्षाच्या निरीक्षकांबरोबरच प्रत्येक मंत्र्यांवर स्वतंत्र जबाबदाऱ्या दिल्या आहेत. गेली आठ दिवस त्यांची टीम कोल्हापुरात तळ ठोकून आहे. महाविकास आघाडीचे शक्तिस्थळ असलेल्या सहकारी संस्थांवर त्यांची विशेष लक्ष दिले असून साखर कारखान्यांसह दूध संघ, बँकांच्या संचालकांना थेट संपर्क सुरू केला आहे. थेट मुख्यमंत्री संपर्क करत असल्याने संबंधित व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होतो. संबंधित पदाधिकारी उघड प्रचारात जरी नाही आला तरी त्याच्या प्रचाराची गती मंदावणे हाच महायुतीचा प्रयत्न दिसत आहे.
नेत्यांची फौज पण वातावरणात बदल होईना?महायुतीकडे दिग्गज नेत्यांची अक्षरश: फौज आहे. या सगळ्या नेत्यांनी मनात आणले तर निवडणुकीत हवा तयार होण्यास वेळ लागणार नाही, एवढी ताकद त्यांच्याकडे आहे. पण, वातावरण निर्मितीत महायुतीचे उमेदवार कमी का पडत आहेत, हा प्रश्न शिंदेसेनेच्या नेत्यांना पडला आहे.
मित्रपक्षांचा वेग वाढवण्यासाठी बूस्टर डोसजिल्हा पातळीवरील मित्रपक्षांचे नेते प्रचारात सक्रिय दिसतात, मात्र स्थानिक पातळीवर अजून म्हणावी तशी गती पकडलेली नाही. स्थानिक कार्यकर्त्यांवरच निवडणुकीचा रंग राहणार असल्याने त्यांचा वेग वाढवण्यासाठी त्या पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.