वारणानगर : तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तेथील स्थानिक नागरिकांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी तसेच वादळी वाऱ्यामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना देऊन त्यांनादेखील नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी जनसुराज्यशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डाॅ. विनय कोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
तसेच जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन झालेल्या नुकसानीबद्दल चर्चा केली.
दि.१५ मे पासून तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला जोरदार फटका बसला आहे. तसेच जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवनदेखील विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक उद्योग-धंदे मोडकळीस आले असून, कोरोनाचे आणखी मोठे संकट राज्यावर आले आहे. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठी पडझड झाल्याचे चित्र आहे. मच्छिमारांच्या बोटींचे तसेच किनाऱ्यालगत असणाऱ्या वस्तीचे मोठे नुकसान झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केली.
फोटो ओळी- तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्र किनारपट्टीसह राज्यातील शेतकरी नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.