राजाराम पाटील -- इचलकरंजी ‘जनतेतून नगराध्यक्ष’ असा प्रयोग पुन्हा शासन राबविण्याचा विचार करीत असून, त्यामुळे येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत होणाऱ्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुतांशी नगराध्यक्ष भाजपचे निवडले जातील, असा व्होरा भाजपचा आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त भाजपकडून ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविली जाणार का, याचीच चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांकडूनसुद्धा अनेक प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग, असा प्रयोग नुकताच सन २0११ मध्ये राबविण्यात आला होता. मात्र, आता दोन नगरसेवकांचा एक प्रभाग, असा प्रयोग राबविण्याचा विचार भाजप करीत आहे. त्यामुळे राज्यातील आगामी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे किंवा भाजपच्या विचारसरणीशी मिळतेजुळते उमेदवार अधिक संख्येने निवडले जातील, असा तर्क लढविला जात आहे. त्याचबरोबर जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेल्यास राज्यातील मोठ्या शहरांमध्ये नगराध्यक्ष भाजपचा होईल, असाही एक विचार आता समोर येत आहे.यापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सन १९७४-७५मध्ये झालेल्या पालिकांच्या निवडणुकीत ‘जनतेतून नगराध्यक्ष’ हा प्रयोग सर्वांत प्रथम राबविण्यात आला. त्यावेळी इचलकरंजीत असलेल्या नागरी आघाडीचे पंडितराव कुलकर्णी विरुद्ध काँग्रेसचे मल्हारपंत बावचकर अशी सरळ लढत झाली होती. या लढतीत पंडितराव कुलकर्णी निवडून आले. मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसचे बहुमत झाले. त्यांनी मांडलेले अनेक विषय काँग्रेस बहुमताने फेटाळत होते. त्यामुळे कुलकर्णी यांना नगरपालिकेचे कामकाज चालविता आले नाही. दोन ते अडीच वर्षांत यांची कारकीर्द त्यावेळी संपुष्टात आली.त्यानंतर सन २00५ मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने ‘जनतेतून नगराध्यक्ष’ ही संकल्पना पुन्हा राबविली. त्यावेळी इचलकरंजीत किशोरी आवाडे (काँग्रेस), कलावती जांभळे (बंडखोर अपक्ष) व आशादेवी कदम (नागरी आघाडी) अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये किशोरी आवाडे या बहुमताने निवडून आल्या. मात्र, त्यावेळी काँगे्रसचे बहुमत झाले नसल्याने त्यांना अन्य पक्षांबरोबर आघाडी करून कामकाज चालवावे लागले. अशा प्रकारे इचलकरंजी नगरपालिकेचा आतापर्यंतचा इतिहास असून, या पार्श्वभूमीवर ‘जनतेतून नगराध्यक्ष’ ही संकल्पना येथे राबविली जात असताना भाजप स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढविणार का, अशा आशयाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण सध्याचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्थापन केलेली शहर विकास आघाडी नगरपालिकेत कार्यरत आहे. त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असेल, तर शहर विकास आघाडीचे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.‘भाजप’च्या नगराध्यक्षांची उत्सुकताभाजपकडे सर्वसाधारणपणे हिंदुत्ववादाचा अंगीकार करणारा पक्ष म्हणून पाहिले जाते. इचलकरंजीत मात्र आगामी नगराध्यक्षपद हे मागासवर्गीय खुला प्रवर्गासाठी आरक्षित आहे, अशा पार्श्वभूमीवर जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा झाल्यास भाजपकडे उमेदवार कोण, असाही प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. उलट काँग्रेस व राष्ट्रवादीकडून काही इच्छुकांनी तशा हालचाली सुरू केल्या असून, सध्या ते विविध उपक्रमांद्वारे जनतेच्या समोर येत आहेत.
थेट नगराध्यक्ष निवडीच्या हालचाली
By admin | Published: April 06, 2016 12:35 AM