कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम जादा कर्मचारी लावून पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत दि. ३१ मे पर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. रस्ते दुरुस्ती आणि पॅचवर्कचा येत्या आठ दिवसांत कृती आराखडा तयार करून पुढील महिन्याभरात सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात थेट पाईपलाईन योजना, अमृत योजनेतील रखडलेली कामे, रस्त्यांची कामे तसेच रोजंदारी तसेच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने बैठक घेतली. यावेळी पालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी, निलोफर आजरेकर, संजय मोहिते, शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, सचिन पाटील सचिन चव्हाण आदी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, थेट पाईपलाईन योजनेचे काम बऱ्याचअंशी पूर्ण होत आले आहे. उर्वरित काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण केले जाईल. जॅकवेल तसेच इंटकवेलची राहिलेली कामे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केली जातील. कामाला गती आली असून, पुढील महिन्यापासून पावणेदोनशे कर्मचारी नियुक्त करून मे २०२२ अखेर काम पूर्ण केले जाणार आहे.
रस्त्यांच्या कामाचा आराखडा करा -
शहरातील खराब रस्त्यावर पॅचवर्क करण्याच्या तसेच नवीन रस्ते करण्याच्या कामाचा येत्या आठ दिवसांत कृती आराखडा तयार करून पुढील एक महिन्यात सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे, याकडे लक्ष दिले जाईल. तसेच तीन वर्षांच्या आत जे जे रस्ते खराब झाले त्यांची यादी तयार करून दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदारांकडून तातडीने करून घेण्यास सांगण्यात आल्याचे पाटील म्हणाले.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ -
रोजंदारी तसेच अग्निशमन विभागाकडील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा विषय राज्य सरकारशी संबंधित असल्याने त्या पातळीवर चर्चा न्याय देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केली. महानगरपालिकेचा स्टाफिंग पॅटर्न हा १९९८ चा असून, त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना प्रत्येकवर्षी दहा टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पॉईंटर -
- ५२.९७ कि.मी. जलवाहिनीपैकी ५० कि.मी.चे काम पूर्ण.
- जलवाहिनींवर बसविण्यात येणाऱ्या ७२ पैकी आठ व्हॉल्वचे काम पूर्ण.
- ४२ कि. मी. जलवाहिनीचे हायड्रोलिक टेस्टिंग पूर्ण.
- पुईखडी जलशुध्दीकरण केंद्राचे ९५ टक्के काम पूर्ण.
- विद्युत पोल व लाईनचे काम १२ कि. मि. पूर्ण, २३ किमीचे काम बाकी.
(फोटो पाठवित आहे. )