कोल्हापूर : चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना विविध परवानग्या रोखल्यानेच ८८७ दिवस पाईपलाईनचे काम थांबले. पालकमंत्री असताना पाच वर्षांत काळम्मावाडी धरणाला भेट न देणाऱ्या पाटील यांना थेट पाईपलाईनवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. स्वत:ला गिरणी कामगारांचा मुलगा म्हणता, मग एकदाही शाहू मिलला का भेट दिली नाही..? असा सवाल पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला.तुम्ही सत्तेवर असताना राष्ट्रीय पातळीवरील आयआयएम, ट्रिपल आयटी, एम्ससारख्या चांगल्या संस्था नागपूरला गेल्या, त्यातील एखादी कोल्हापुरात व्हावी यासाठी का प्रयत्न केले नाहीत..? कोल्हापूरकरांना शब्द दिल्याप्रमाणे थेट पाईपलाईनचे काम नक्की पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही सतेज पाटील यांनी शनिवारी रात्री झालेल्या सभेत दिली. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. कसबा बावडा येथे झालेल्या सभेला प्रचंड गर्दी झाली. १ नंबरच्या उमेदवार जयश्री जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.सतेज पाटील म्हणाले, विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देणार नाही. मी संयम पाळणारा माणूस आहे. याचा अर्थ मी कायम गप्प बसणार आहे असा नाही. विरोधकांना वेळ आल्यावर योग्य उत्तर नक्की देईन. ज्यांचे संस्कार २ नंबरचे आहेत त्या मटका, नाफ्तावाल्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार..? बावडेकरांचे दांडक किती घट्ट आहे हे कदमांना मतदानातून दाखवून द्या.जयश्री जाधव म्हणाल्या, या निवडणुकीत सतेज पाटील भावासारखे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. महाविकास आघाडीची ताकद आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टामुळे माझा विजय निश्चित आहे.यावेळी खा. विनायक राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार धैर्यशील माने, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. पी. एन. पाटील, आ. जयंत आसगांवकर, आ. राजू आवळे, आ. ऋतुराज पाटील, विजय देवणे, दिलीप शेटे, तेजस पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, करण काकडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
बावड्याची कायम साथडॉ. संजय डी. पाटील म्हणाले, डी. वाय. पाटील कुटुंबीयांना नेहमीच आपण सर्वांनी साथ दिली आहे. बावड्याच्या प्रगतीसाठी आम्ही कधीही कमी पडणार नाही. बावडा नेहमीच आमच्या पाठीशी राहिला असून, यापुढेही राहील याचा विश्वास आहे.
गावाला अभिमान वाटेल असे काम करेन
कसबा बावडा हा नेहमीच प्रत्येक सुख दुःखाच्या काळात आमच्या सोबत राहिला आहे. बावड्याच्या विकासासाठी आमच्या कुटुंबातील तिसरी पिढी सेवेत आहे. गावचा सुपुत्र म्हणून आपल्याला अभिमान वाटेल असे काम करीत राहीन. विरोधकांचा प्रचार करणाऱ्या बावड्यातील मोजक्या लोकांना त्यांच्या माता-भगिनींनी तुमच्यासाठी विरोधकांनी काय केले..? हा प्रश्न नक्की विचारावा. कसबा बावडा या आपल्या घरात दुधात मिठाचा खडा टाकू देऊ नका, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार
येत्या दोन वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा कसबा बावडा येथे उभारणार आहे. त्याची जबाबदारी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे दिली असून, त्यासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.