कोल्हापूर : सासने ग्राऊंडजवळ एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधील साहित्य बाहेर काढण्याच्या वादातून एकाने वॉचमनला बंदूक आणि भाल्याचा धाक दाखवत दमदाटी केली. हा प्रकार रविवारी (दि. ८) सकाळी आणि सायंकाळी घडला. याबाबत भीमराव महादेव पाटील (वय ५३, रा. उत्रे, ता. पन्हाळा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयित तुकाराम यशवंत कदम (वय ६०, रा. सेंटर वन अपार्टमेंट, सासने ग्राऊंडजवळ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.सेंटर वन अपार्टमेंमध्ये रखवालदारीचे काम करणारे भीमराव पाटील रविवारी सकाळी आठ वाजता कामाच्या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी तुकाराम कदम हे भाला घेऊन पार्किंगमध्ये आले. पाटील यांच्यावर भाला रोखून पार्किंगमधील साहित्य, दुचाकी आणि कचरा बाहेर टाका, नाहीतर भाल्याने भोसकणार अशी धमकी दिली.
त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कदम हे बारा बोअरची बंदूक घेऊन पार्किंगमध्ये आले. तुम्हाला मस्ती आली आहे. इथं थांबायचं नाही. घरी निघून जायचं, असे म्हणत त्यांनी रखवालदार पाटील यांच्यावर बंदूक रोखली आणि आता तुला ठोकतोच, अशी धमकी दिली.कचरा काढण्याच्या क्षुल्लक वादावरून थेट बंदूक रोखण्याच्या प्रकारामुळे सासने ग्राऊंड परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, संशयिताची चौकशी सुरू केली आहे.