संदीप आडनाईक
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे नवे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक म्हणून नानासाहेब लडकत यांनी कोल्हापुरात गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. पूर्वीचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण हे सेवानिवृत्त झाल्याने ही नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांच्याकडून वनसंरक्षकपदाचा कार्यभार नानासाहेब लडकत यांनी दुपारी स्वीकारला. यासाठी बुधवारी सकाळी निघालेल्या लडकत यांनी पुण्याहून सायकलीने १२ तास प्रवास करत कोल्हापूर गाठले.
लडकत हे महाराष्ट्र वनसेवेत १९८६-८७ च्या तुकडीमध्ये रुजू झाले. त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कामाची सुरुवात केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे त्यांनी सहायक वनसंरक्षक म्हणून काम केले. भारतीय वनसेवेत २००६ मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली. लडकत यांनी यापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअरचे उपसंचालक म्हणून काम पाहिले आहे.
कोल्हापूर येथील पदभार स्वीकारण्यापूर्वी ते पुणे येथे वनसंरक्षक कार्य व आयोजन येथे कार्यरत होते. कोईम्बतूर येथे वन्यजीव प्रशिक्षण व भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून येथे वन्यजीव व्यवस्थापनाचा पदव्युतर डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला आहे. कऱ्हाड येथे त्यांचे स्वागत उपसंचालक उत्तम सावंत, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, बाळकृष्ण हसबनीस यांनी केले. त्यांच्या स्वागताला मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, क्रिएटिव्ह नेचर फ्रेंड्सचे नाना खामकर, हेमंत केंजळे उपस्थित होते.
पुण्याहून सायकल चालवत येऊन स्वीकारला पदभारवनसंरक्षक लडकत भारतीय वनसेवेमधील सहायक विभागीय आयुक्त दर्जाचे उच्च अधिकारी आहेत. दारात लाल दिव्याची गाडी आहे. तरीही संचालकपद स्वीकारण्यासाठी ५६ वर्षीय लडकत यांनी निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करा हा संदेश देण्यासाठी त्यांनी पुण्याहून १२ तास सायकल चालवत सरासरी २० किलोमीटर प्रतितास २४८.९४ किलोमीटर अंतर पार केले. सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांनी त्यांनी पुणे सोडले.