कोल्हापूर : गोकुळच्या सभेत अनावधानाने माझ्याकडून गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा एकेरी उल्लेख केल्याचे सोमवारी पाहण्यात आलेल्या एका व्हिडिओतून निदर्शनास आले. याबद्दल पाटील यांची दिलगिरी व्यक्त करते, अशा आशयाची पोस्ट गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी समाजमाध्यमावर शेअर केली.मी हेतुपूर्वक एकेरी उल्लेख केलेला नव्हता. ते वयाने मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांचा आदरच करते. पण, याचा अर्थ असाही नाही की माझ्या विरोधाची धार कमी होईल. चुकीच्या धोरणांना माझा विरोध कायम राहील. माझ्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित सर्वतोपरी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.महाडिक त्यांच्या वडिलांच्या वयाच्या असणाऱ्या व्यक्तीबद्दल कशी भाषा वापरतात, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘हीच महाडिक यांची संस्कृती,’ अशी टीकाही त्यावर झाली. त्याची दखल घेऊन त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे.पोस्टमध्ये त्या म्हणतात, गोकुळच्या सोमवारी झालेल्या सभेत आपल्या कार्यकर्त्यांना सभागृहात बसवून सत्ताधाऱ्यांनी खऱ्या सभासदांना बसण्यासाठी जागाच ठेवली नव्हती. आमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे न देता, म्हणणे न ऐकता अहवाल वाचन केले. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता म्हणून आमचा माईक वापरला. पण, त्याचाही आवाज अध्यक्षांपर्यंत पोहोचला नाही. साहजिकच आम्हा सर्वांची सहनशीलता संपली. त्यात अनावधानाने अध्यक्ष पाटील यांच्याबद्दल एकेरी उल्लेख झाला, हे व्हिडिओमुळे समजले. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते.
गोकुळ सभा: ..अन् चुक लक्षात येताच शौमिका महाडिकांनी व्यक्त केली दिलगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 1:18 PM