लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांनी केलेल्या कारभाराबाबत पणन मंत्र्यांकडे दाखल केलेली याचिका मंत्री बाळासाहेब पाटील यांनी फेटाळली. याबाबत पणन संचालकांकडे दाद मागण्याचे आदेशही त्यांनी दिले.
बाजार समितीच्या माजी संचालकांनी पाच वर्षात केलेल्या कामकाजासह नोकरभरतीची जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राधिकृत अधिकारी प्रदीप मालगावे व एन. ए. पारजने यांनी चौकशी करून संचालक मंडळावर ठपके ठेवले होते. संचालकांनी राजीनामे दिले होते; मात्र इतर कारवाई होऊ नये, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीन-चार महिने न्यायालयात हे प्रकरण होते. त्यानंतर अचानक न्यायालयातून काढून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे दाखल केली होती. मंत्र्यांसमोर ९ फेब्रुवारी व १६ मार्च रोजी सुनावणी झाली. मात्र जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या कारवाई विरोधात थेट मंत्र्यांकडे अपील करता येत नाही, अथवा प्राधिकरणाला ते अधिकार नाहीत. मंत्री पाटील यानी संचालकांची याचिका फेटाळून लावत असताना पणन संचालकांकडे अपील करण्याचे आदेश दिले.