कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्यातील नोकर भरतीवरून गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत संचालकांना चांगलीच ‘तंबी’ दिली. नोकर भरतीचा वाद आजच संपवण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे समजते. कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर व काही संचालकांमध्ये या विषयावरून तीव्र मतभेद आहेत. कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता नोकर भरती करणे अडचणीचे ठरणार असल्याने संचालक मंडळात उभी फूट पडली आहे. नोकर भरतीत गैरव्यवहार झाल्याची चर्चा ‘भोगावती’ परिसरात जोरदार सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याची दखल घेतली आहे. सोमवारी सकाळी दूरध्वनीवरून कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह प्रमुख संचालकांची नेत्यांनी कानउघाडणी केल्याचे समजते. ‘शेकाप’चे संचालक अशोकराव पवार व विश्वास वरूटे यांनी दिलेले राजीनामे मागे घेण्याची सूचनाही संबंधितांना नेत्यांनी दिली.मुश्रीफ यांनी भेट नाकारली!गेले चार दिवस ‘भोगावती’च्या सत्तारूढ गटातील अंतर्गत राजकारणाचा प्रसारमाध्यमांतून पंचनामा सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीच्या काही संचालकांनी त्यांची सोमवारी भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण आमदार मुश्रीफ यांनी त्यांना भेट नाकारल्याचे समजते.
राष्ट्रवादी नेत्यांची संचालकांना ‘तंबी’
By admin | Published: October 13, 2015 12:59 AM