कोल्हापूर : विविध आरोपांचा कांगावा करून शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी विरोधक मागणी करीत आहेत. पायांखालची वाळू घसरू लागल्याने विरोधकांकडून हे उद्योग सुरू आहेत. त्यांनी कोणत्याही थराला जाऊन बँकेची सत्ता घेण्याचे ठरविले आहे; पण सभासद ते कधीही होऊ देणार नाहीत. कोणत्याही आणि कितीही चौकशांना सामोरे जाण्यास माझ्यासह संचालक मंडळाची तयारी आहे, अशी माहिती दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष वरुटे म्हणाले, विरोधकांनी आॅगस्ट २०१३ मध्ये जिल्हा उपनिबंधकांकडे सत्तारूढ संचालकांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली. त्यानुसार करवीरचे सहनिबंधक प्रदीप मालगावे यांनी चौकशी केली. त्यातील अहवालामध्ये कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. त्यावर विरोधकांनी पुन्हा सप्टेंबर २०१४ मध्ये कोल्हापूर उपनिबंधकांनी चौकशी करावी, अशी लेखी मागणी केली. त्यानुसार कोल्हापूर शहरचे सहायक निबंधक रंजन लाखे यांनी चौकशी केली. यात त्यांनी तरलता राखणे, डिव्हिडंड वाटप यांबाबत परवानगी घेणे आवश्यक होते, अशा सूचना केल्या आहेत. त्याचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून आरोपांचा कांगावा सुरू आहे. विद्यमान संचालक मंडळाने याची चौकशी सखोल व्हावी म्हणून सहकार्य केले आहे. त्यामुळे पुन्हा चौकशी केल्यास तिला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. मागील संचालक मंडळासारखे आम्ही चौकशीला न्यायालयाची स्थगिती कधीच घेणार नाही. बँकेत मोठे खर्च करताना त्याबाबत सर्वसाधारण सभेत विषय मांडून मंजुरी घेतली आहे. काम झाल्यानंतरही खर्चाला मंजुरी घेतली आहे. विरोधकांच्या तथ्यहीन आरोपांमुळे बँकेची बदनामी होत आहे. बदनामीप्रकरणी विरोधकांवर दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष वसंत जोशीलकर, संचालक सुभाष निकम, रावसाहेब देसाई, डी. पी. पाटील, बी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. शिक्षक संघच राहील...शिक्षक संघाची पकड जिल्ह्यासह राज्यात चांगली आहे. विरोधकांमध्ये समिती व पुरोगामी शिक्षक संघटनेमध्ये निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार नाही. या संघटना एकत्र निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वरुटे यांनी सांगितले. ते म्हणाले, या पद्धतीने संबंधित संघटना लढल्यास भविष्यात त्यांचे अस्तित्व राहणार नसून शिक्षक संघ ही एकमेव संघटना राहणार आहे.
संचालक चौकशीला सामोरे जाणार
By admin | Published: February 11, 2015 11:40 PM