कोल्हापूर : शाळा म्हणजे विद्येचे मंदिर. विद्यार्थ्यांचा दिवसातल्या सहा तासांहून अधिक काळ ज्या वास्तूत जातो त्या शाळांच्या स्वच्छतागृहांचे मात्र ‘डर्टी पिक्चर’ आहे. गळक्या पडक्या, कुलूपबंद, अस्वच्छ आणि कोंदट वातावरणात असलेल्या या स्वच्छतागृहांमध्ये जाताना विद्यार्थिनींना नाकाला रुमाल लावावा लागतो. शासनाच्या ‘३० विद्यार्थ्यांमागे एक स्वच्छतागृह’ या निकषाचे कोणत्याही शाळेत पालन होत नसल्याचे चित्र आहे. महिला स्वच्छतागृहांकडे फारसे गांभीर्याने कधीच पाहिले जात नाही. मात्र, शाळांसारख्या महत्त्वाच्या वास्तूंमध्येही विद्यार्थ्यांची स्वच्छतागृहांअभावी कुचंबणा होते. विद्यार्थी एकवेळ अन्यत्र पर्याय शोधू शकतात. मात्र, मुलींना गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो. अस्वच्छ स्वच्छतागृहांत जावेसेच वाटत नाही. त्यामुळे अनेक मुली पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. स्वच्छतागृहात जावेच लागले तर मुलींना नाकाला रुमाल लावून स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. या दोन्ही प्रकारांमुळे मुली आजारी पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने चार शाळांमधील स्वच्छतागृहांची पाहणी केली. सगळ््याच शाळांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अस्वच्छता होतीच. त्यामुळे शाळेचे ‘स्वच्छतागृह नको रे बाबा’ म्हणत विद्यार्थिनींनी नाके मुरडली. (क्रमश:)प्रायव्हेट हायस्कूल नावाजलेली शाळा म्हणून प्रायव्हेट हायस्कूलचा लौकिक आहे. या शाळेत पंधराशेहून अधिक विद्यार्थी आहेत. त्यापैकी विद्यार्थिनींची संख्या साडेसातशे ते आठशेच्या दरम्यान आहे. या शाळेत स्वच्छतागृहांची फार दुरवस्था आहे. शाळेच्या मुख्य इमारतीत मुलींसाठी दोनच स्वच्छतागृहे आहेत. खाली असलेल्या स्वच्छतागृहात वरून पावसाचे पाणी गळते. अतिशय कोंदट वातावरण आहे. वरच्या मजल्यावरील स्वच्छतागृहाला दरवाजे आणि पाणी आहे पण स्वच्छतागृहांच्या भिंतीची अवस्था खूप खराब आहे. या दोन्ही स्वच्छतागृहांत जायला नकोसे वाटते. तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहाला गळती असल्याने ते बंद आहे. शिक्षकांनाही स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. समोरच्या बाजूला असलेल्या मराठी शाळेच्या विभागातही अपुरी स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे मध्यंतरी पालकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आता येथे वाढीव स्वच्छतागृहांची बांधणी सुरू आहे. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचाही नावलौकिक मोठा आहे. या शाळेत जवळपास अठराशे विद्यार्थिनी आहेत. येथील प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह आहे पण अस्वच्छ. स्वच्छतागृहासमोरच पाणी तुंबलेले होते तेथेच वॉश बेसिन आहे. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शाळेने बोअर मारून घेतले आहे, त्यातील पाणी फिल्टर करून पिण्यासाठी वापरले जाते, त्यामुळे विद्यार्थिनी आणि शिक्षकही घरूनच पाणी आणणे पसंत करतात, ही वस्तुस्थिती आहे.
शाळेतील स्वच्छतागृहांत डर्टी पिक्चर
By admin | Published: July 27, 2016 12:10 AM