उदगांव : जिल्ह्यातील दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप अडचणींना सामोरे जावे लागले. हातावरचे पोट असणाऱ्या अंध, अपंगांना लॉकडाऊन काळात पोट भरणेही मुश्किलीचे बनले आहे. शासनाच्या विविध योजना जाहीर झाल्या आहेत. परंतु, आतापर्यंत त्या कार्यान्वित करण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे दिव्यांगांतून नाराजीचा सूर पसरला आहे.
जिल्हा परिषदेने दिव्यांगांसाठी २ कोटी ६१ लाख रुपये राखीव ठेवले आहेत. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यातून ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण देणे, सानुग्रह अनुदान देणे, विवाह प्रोत्साहन अनुदान देणे, खेळाडूंना अनुदान देणे, शिष्यवृत्ती देणे, रोजगारासाठी बीज भांडवल पुरविणे, आदी योजनांचा समावेश केला आहे.
दिव्यांगांसाठी इतकी तरतूद असूनही त्याची वर्ष संपत आले तरी त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या नसल्याने अपंग संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्या योजनांना प्रथम प्राधान्य द्यावे आणि तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी दिव्यांगांतून होत आहे.
कोट - दिव्यांगांच्या बाबतीत शासनाने ठोस भूमिका घ्यावी. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान मिळणार होते ते अद्यापही जमा झाले नाही. उर्वरित योजना शासनाने खास बाब म्हणून तत्काळ राबवाव्यात.
- अर्जुन पाटोळे, दिव्यांग, चिंचवाड