कोल्हापूर : विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी सरकारच्या पातळीवर विविध योजना आणल्या जात असताना दुसरीकडे मात्र याच यंत्रणेकडून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचाही प्रकार घडत असल्याचा प्रत्यय येत आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या मूल्यमापन चाचणी-२ (पॅट) परीक्षेच्या कालावधीतच शिक्षकांचे निवडणुकीचे प्रशिक्षण ठेवल्याने विद्यार्थ्यांसह पालकही हतबल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी येत्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृहात निवडणूक प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. याच कालावधीत शिक्षण विभागाकडून घेण्यात येणारी पॅट संकलित मूल्यमापन चाचणी-२ परीक्षा आहे. मात्र, या परीक्षा सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत घेऊन संबंधित शिक्षकांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. वास्तविक या परीक्षा सकाळी ८.३० पासून सुरू होणार होत्या. शिक्षकांच्या निवडणूक प्रशिक्षणासाठी त्याची वेळ एक तास आधी घेतली आहे. केवळ निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी इतक्या सकाळी विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन प्रशासनाने त्यांची ससेहोलपट सुरू केली आहे. अनेक शिक्षकांचे ६ एप्रिलला प्रशिक्षण आहे. याच दिवशी मूल्यमापन चाचणी २ या परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की प्रशिक्षण करायचे, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.
प्रशिक्षणाची तारीख बदलाविद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन प्रशिक्षणाच्या ठिकाणी पोहोचणे शिक्षकांसाठी अति धावपळीचे ठरणार आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी तर ही कसरत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर प्रशिक्षण घ्या अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.त्या कर्मचाऱ्यांनाही मिळेना सूटअपंग, गंभीर आजारी स्तनदा माता यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेऊ नये अशा आयोगाच्या सूचना आहेत. मात्र, जिल्ह्यातील अशा बहुतांश कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. अशा कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षाकडे धावही घेतली. पण त्यांचे म्हणणेच ऐकून घेतले जात नसल्याने हे कर्मचारी हतबल झाले आहेत.
अपंग, गंभीर आजारी स्तनदा माता यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेऊ नये अशा आयोगाच्या सूचना आहेत. मात्र, प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तक्रार केली तर ऐकून घेतले जात नाही. -अर्जुन पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुणे विभाग