लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या समाजकल्याण समिती सभेत समिती सदस्यांमध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. दलित वस्तीच्या निधीतील कामे मंजूर करण्यावरून नऊपैकी पाच सदस्यांनी वेगळी लेखी भूमिका मांडली आहे. मात्र, सभापती स्वाती सासने यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दलित वस्ती निधीतील ३६ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी देण्याचा विषय समाजकल्याण समितीच्या मासिक बैठकीत पाचव्या क्रमांकावर घेण्यात आला होता. याबाबत समितीच्या बैठकीत चर्चाही करण्यात आली. मात्र, ६७ पैकी केवळ १५ जणांनीच कामांच्या याद्या आणून दिल्या आहेत. त्यामुळे आता हा विषय मंजुरीसाठी नको, असे काहींचे म्हणणे होते. मात्र, सभापती सासने या कामांना मंजुरीचा ठराव करण्याच्या भूमिकेत होत्या. परंतु, समिती सभागृहात बैठक झाल्यानंतर सुभाष सातपुते, मनिषा कुरणे, विशांत महापुरे, महेश चौगले, मनिषा माने या पाचजणांनी समितीचे सचिव आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांची भेट घेऊन त्यांना हा कामांच्या मंजुरीचा विषय पुढच्या बैठकीत घेण्यात यावा, असे लेखी पत्र दिले. त्यामुळे याच बैठकीत सर्व कामे मंजूर करून घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पाचजणांमध्ये तीन विरोधी तर दोन सत्तारूढ सदस्य आहेत.
कोट
आमचा कोणत्याही कामांना विरोध नाही. परंतु, बहुतांशी सदस्यांनी कामांची पत्रे दिलेली नाहीत. त्यांची पत्रे आल्याशिवाय कामांना मंजुरी देणे योग्य वाटले नाही. म्हणूनच आम्ही पाचजणांनी लेखी पत्र दिले. यामध्ये कोणतीही कामे अडविण्याचा हेतू नाही.
सुभाष सातपुते,
सदस्य, समाजकल्यााण समिती
पालकमंत्री सतेज पाटील यांनी ठरवून दिलेल्या सुत्रानुसार जर कामे मंजूर होत असतील तर त्याला विरोध करणे चुकीचे आहे. काॅंग्रेसच्याच सुभाष सातपुते आणि शिवसेनेच्या मनिषा कुरणे यांनी विरोधी भाजप, जनसुराज्यच्या सदस्यांना हाताशी धरून असे पत्र देणे योग्य नाही.
स्वाती सासने, सभापती, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर