नृसिंहवाडी : महापुरासह अन्य आपत्ती परिस्थितीचा मुकाबला करून जीवित आणि वित्तहानी कशी टाळावी याबाबतच्या प्रात्यक्षिकाचे दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील संगमघाटावर पार पडले. या प्रात्यक्षिक शिबिरामध्ये व्हाईट आर्मी, जय हिंद, वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी सहभाग घेतला होता.
येथील कृष्णा पंचगंगा नदी पात्रात व घाटावर हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा समारोप व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे, दत्त देव संस्थानचे सचिव महादेव पुजारी, उद्योगपती दिलीप पटेल यांच्या उपस्थितीत झाला.
अशोक रोकडे म्हणाले, व्हाईट आर्मी ही राष्ट्रीय पातळीवर काम करत असून माणुसकी जपणारे, आपत्ती काळात जीव वाचवणारे सैनिक म्हणजे व्हाईट आर्मी होय. सर्व प्रकारच्या आपत्तीमध्ये आमचे ट्रेनिंग घेतलेले जवान भाग घेत असतात, त्यांना आपत्ती काळात चोवीस तास अलर्ट राहावे लागते. येथे दक्षिण महाराष्ट्रातील पहिले प्रत्यक्ष ट्रेनिंगचे शिबिर घेण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावातील तरुणांना हे ट्रेनिंग देण्यात आले आहे. यामध्ये ५५ जवानांना प्रत्यक्ष बोट ट्रेनिंग देऊन पूर्णत: प्रशिक्षित करण्यात आले आहे. एकूण ७० हून अधिक मुला-मुलींनी यात सहभाग घेतला. यामध्ये १२ मुलीही चांगल्या प्रशिक्षित झाल्या आहेत. हे आता महापूर असो वा अन्य आपत्तीत तोंड देण्यास सज्ज झाले आहेत. प्रात्यक्षिक शिबिरात सागर वनकोरे, प्रतीक ऐनापुरे, रऊफ पटेल, नीलेश तबंदकर आदींनी जवानांना मार्गदर्शन केले.
फोटो - १९०७२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रात्यक्षिक घेण्यात आले.