कोल्हापूर, दि. १३ : वेळ साडेअकराची.., शुक्रवार असल्याने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी आपआपल्या कामात व्यस्त होते. अचानक मध्यवर्ती बसस्थानक येथील वर्कशॉपमध्ये गॅसचा स्फोट होवून एक कर्मचारी जळाला असून पाच गंभीर झाले आहेत. तत्काळ मदतीची गरज असलेचा संदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्तीविभागाने सर्व यंत्रणेला दिला.
या संदेशाने पोलीस, अग्निशामकद दल, आरोग्य विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाऱ्यामध्ये तारांबळ उडाली. अवघ्या पंधरा मिनिटांत सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. पटापट चालत्या गाडीतून पोलिसांसह अग्निशामक दलाच्या जवाणांनी उड्या मारत वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीकडे धाव घेतली. जखमी पाच कर्मचाऱ्याना आरोग्य विभागाच्या रुग्णवाहीकेतून तत्काळ सीपीआरला नेले. पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आनली. सुमारे दीड तास हा थरार सुरु होता.
वर्कशॉपच्या बाहेर लोक श्वास रोखून बसले होते. आॅपरेशन यशस्वी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापक विभागाचे अधिकारी दिनकर कांबळे यांनी ही रंगीत तालीम असल्याचे सांगितले. त्यानंतर श्वास रोखून बसलेल्या डॉक्टर, पोलीस, जवान, प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
देशामध्ये होत असलेल्या अतिरेकी हल्ल्यांंच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला अतिदक्षतेच्या सूचना जारी केल्या आहेत. धार्मिक ठिकाणे, प्रार्थनास्थळे, मॉल, शाळा, आदी ठिकाणी सुरक्षा व्यवस्था व बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पोलीस यंत्रणेची सतर्कता पडताळण्यासाठी शहरात रंगीत तालीम घेतली.
अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये रुग्ण व नातेवाइकांची गर्दी होती. शनिवारी बहुतांश पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यांत व्यस्त होते. काहींची रात्रड्यूटीवर येण्यासाठी लगबग सुरू होती. अचानक अॅस्टर आधार येथे अतिरेकी हल्ला झाल्याचा निनावी दूरध्वनी कंट्रोल रूमला येताच ड्यूटीवर असलेल्या पोलिसांची बोबडीच वळली. त्यांनी हा संदेश शहरातील व उपनगरातील सर्व पोलीस ठाण्यांना बिनतारीवरून दिला. त्यानंतर तत्काळ पोलीस अधीक्षकांनाही संदेश दिला.
शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, क्राइम ब्रँच, बॉम्बशोधपथक, राज्य राखीव दल, स्पेशल कमांडर, जलद कृती दलाचे जवान, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, बिट मार्शल, अग्निशामक दल, रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक असा लवाजमा काही मिनिटांतच हॉस्पिटल परिसरात पोहोचला. हॉस्पिटलला चारीही बाजूंनी वेढा घालून काही जलद कृती दलाचे जवान व सशस्त्र पोलिसांचे पथक मुख्य इमारतीच्या दिशेने चाल करून गेले.
समोरून कोणत्याही क्षणी गोळीबार होऊ शकतो, ही खबरदारी घेत जवान व पोलीस आतमध्ये घुसले. आतमध्ये कर्मचारी व ग्राहक स्तब्ध होऊन उभे होते. काही वेळापूर्वी गलबलाट असणाºया हॉस्पिटलमध्ये काहीवेळ नीरव शांतता पसरली. माकडटोप्या घातलेले तिघे अतिरेकी हातांमध्ये रोखलेल्या बंदुका घेऊन फिरत होते. यावेळी पोलिसांनी एका-एका अतिरेक्यास लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला; परंतु काही क्षणांत अतिरेक्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये एक अतिरेकी ठार झाला; तर अन्य दोघे शरण आले.
हा थरार हॉस्पिटलमधील डॉक्टर, रुग्ण व नातेवाईक श्वास रोखून होते. बाहेरील नागरिक आजूबाजूला लपूनछपून हा सर्व थरार पाहत होते. या परिसरातील सर्व वाहतूक काहीवेळ बंद करण्यात आली होती. बॉम्बशोध पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढत बॉम्बची तपासणी केली.
आॅपरेशन यशस्वी झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक राणे यांनी पोलीस अधीक्षक देशपांडे यांना कॉल दिला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. या आॅपरेशनमध्ये पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, अनिल देशमुख, अमृत देशमुख, अरविंद चौधरी, जलद कृती दल, जवळपास ११७ पोलीस कर्मचाऱ्यानी सहभाग नोंदविला.
रहिवाशी भयभीतअॅस्टर आधार हॉस्पिटल परिसराला पोलिसांनी घातलेला सशस्त्र घेराव आणि त्यांची घालमेल पाहून काहीतरी घडल्याची जाणीव परिसरातील रहिवाशी नागरिकांना झाली. त्यांनी कानोसा घेतला असता अतिरेकी हल्ला झाल्याचे समजताच त्यांना धडकीच बसली. सुमारे दीड तास आॅपरेशन सुरू होते. तोपर्यंत नागरिक श्वास रोखून बसले होते. आॅपरेशनच्या समाप्तीनंतर मात्र पोलिसांनी नागरिकांना दिलासा देत रंगीत तालीम असल्याचे सांगितले.
गोळीबाराचा बनावहॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. त्यामध्ये एक अतिरेकी ठार, तर दोघे शरण आले. हा संपूर्ण प्रसंग चित्रपटातील दृश्याप्रमाणे दाखविण्यात आला. आॅपरेशनमध्ये गोळीबार व नकली अतिरेकी घुसल्याचा बनाव करण्यात आला होता. तसेच हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास पूर्वकल्पना देऊन आॅपरेशन राबविण्यात आले होते.