कोल्हापूर : यंदा पाऊस चांगला होणार असल्याने संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्राथमिक टप्प्यांवरील कामकाजाला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात आपदा मित्र, कंट्रोल रुमच्या ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली आहे.हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. चांगला पाऊस म्हणजे कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून संभाव्य महापुराची शक्यता असाच आजवरचा अनुभवी अंदाज आहे शिवाय गेली दोन वर्षे जिल्ह्यात पूर आलेला नसल्याने यंदा पुराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच याची तयारी सुरू केली आहे.महापुराचा सर्वाधिक फटका हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गावांना बसतो. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या दोन्ही तालुक्यांमधील पूरग्रस्त गावांची पाहणी करून तेथे किती फुटांपर्यंत पाणी येते, नागरिकांच्या निवाऱ्याची सोय, आरोग्य सेवा, पशुधनाची व्यवस्था या सर्व तयारीची माहिती घेतली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनकडील यंत्रणा
- रबर बोट : ७०
- लाईफ जॅकेट : ७००
- लाईफ रिंग : ३०६
- हेवी ड्युटी सर्च लाईट : २०
- सॉ कटर : २४
- हायड्रॉलिक कटर : ६
- ब्रिथिंग ॲपरेंटस : १८
- इर्मजन्सी इन्फलेटेबल लाईट : ६
महापुरात काम करणाऱ्या संस्थापोलिस सेवा संघटना, आधार आपत्ती जीवरक्षक संस्था, टाकवडे, वजीर फौंडेशन, शिरोळ, प्रथमदर्शी सेवा संस्था, शिरोळ, स्वराज्य रेस्क्यू फोर्स बिद्री, जीवनज्योत सेवा संस्था, हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशन, जीवनमुक्ती सेवा संस्था, जीवनरक्षक, लाईफ फौंडेशन
दोन हजार आपदा मित्र व सखीनागरिकांच्या बचावासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत २ हजार आपदा मित्र व आपदा सखींची टीम काम करते. त्यामध्ये १३०० युवक व ७०० युवतींचा समावेश आहे. दरड कोसळणे, पाण्याचा वेढा, घरी नागरिक अडकणे, भूस्खलन अशी कोणतीही आपत्ती येवो, जवानांची टीम तेथे मदतकार्यासाठी जाते.
आजपासून ३ दिवस प्रात्यक्षिक व तपासणीसंभाव्य महापुरात काम कसे करावे याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आज शुक्रवारपासून तीन दिवस राजाराम तलाव येथे होत आहे. त्यात आपत्ती व्यवस्थापनकडील सर्व साहित्य सुस्थितीत आहेत, योग्य पद्धतीने काम करत आहेत याची तपासणी केली जाईल. येथेच आपदा मित्र, सखींसह यामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांना साहित्यांचा वापर कसा करावा, अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू कसे करावे, त्यांच्यावर प्रथमोपचार, सुरक्षित ठिकाणी पोहोचविणे असे आपत्ती काळातील कामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
१०७७ वर फोन कराजिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूम वर्षभर २४ तास कार्यरत असते वर्षभरात कुठेही काही घटना घडली की आपत्तीकडून त्याची दखल घेऊन मदत केली जाते पण १ जूनपासून ही यंत्रणा अलर्ट मोडवर असते. येथे तीन शिफ्टमध्ये ३ कर्मचारी व १ शिपाई असे चार व्यक्ती कार्यरत असतील. नागरिकांनी १०७७ या टोलफ्री क्रमांकावर फोन केल्यास त्यांना मदत पोहोचवली जाईल.