कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्येक आपदा सखीने आपापल्या तालुक्यातील शाळांना भेटी देऊन तेथील आपदा सखींना प्रशिक्षण द्यावे आणि नवीन आपदा सखी तयार कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सोमवारी येथे केले.रमणमळा परिसरातील गृहरक्षक दल केंद्रात १२ जूनपासून सुरू असलेल्या आपदा सखी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, अशोक पाटील यांची होती.कार्यशाळेत सहभागी झालेल्या आपदा सखींना निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व आपदा कीटचे वितरण करण्यात आले. परीक्षेत यश मिळविलेल्या आपदा मित्र स्वयंसेवकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.प्रशांत संकपाळ यांनी सर्व उपस्थित आपदा मित्र स्वयंसेवकांना जिल्ह्यात कोठेही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी आपण स्वयंस्फूर्तीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करून जिल्हा प्रशासनाबरोबर कायमस्वरूपी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच जिल्ह्यात पूर या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपदा मित्र ही संकल्पना राज्यातून प्रथमत: कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आपदा मित्र म्हणून प्रथम नागपूर येथे प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक सुनील कांबळे, ओंकार कारंडे, महेश पाटील, कृष्णात सरोटे व आधार रेस्क्यू फोर्स टाकवडे या संस्थेचे प्रमोद पाटील, सूरज मुरगुंडे, आदी उपस्थित होते.