* मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार
आजरा : आंबेओहोळ धरणग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, खोटे गुन्हे तातडीने मागे घ्या. अन्यथा पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिला आहे.
धरणासाठी जमीन देणाऱ्या धरणग्रस्तांवर आजही वाईट परिस्थिती आहे. गेली ३० ते ४० वर्षे आपल्या न्याय हक्कांसाठी धरणग्रस्त लढा देत आहेत. १०० टक्के पुनर्वसन नाही. जमिनी व अन्य मोबदले मिळालेले नाहीत. त्यासाठीच आंदोलन करत असताना पाटबंधारे खात्याकडून प्रकल्पग्रस्तांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. धरणग्रस्तांशी प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा न करता आंबेओहोळ धरणाचे काम सुरू केले. धरणग्रस्तांचे प्रश्न सुटल्याशिवाय धरणाचे काम करू देणार नाही. यासाठी आंबेओहोळ धरणग्रस्तांचे आंदोलन सुरू असताना चुकीच्या पद्धतीने सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केले आहे. त्याचा मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने अशा अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करत आहे.
पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंबेओहोळ प्रकरणात लक्ष द्यालावे, खोटी फिर्याद देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या धरणग्रस्तांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदनावर, प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, संग्राम सावंत, समीर खेडेकर, संजय कांबळे, लक्ष्मी कांबळे, जयश्री कांबळे यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------------------
फोटो ओळी : ‘आंबेओहोळ धरणग्रस्तांवरील गुन्हे मागे घ्या’ या मागणीचे निवेदन देताना राजाभाऊ शिरगुप्पे, संग्राम सावंत यासह कार्यकर्ते.
क्रमांक : १०१२२०२०-गड-०६