गडहिंग्लज : बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातील १००० क्युसेक्स पाणी धरणाच्या उजव्या कालव्यातून सोडले.त्यामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे जाणकारांचे मत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात चंदगड तालुक्यातील कोवाड आणि गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी परिसराला हिडकलच्या पाण्यामुळेच महापूराचा फटका बसतो, त्यामुळे 'हिडकल'चे पाणी सोडण्यात यावे, अशी जनतेची मागणी होती.
यासंर्भात आमदार राजेश पाटील यांनी कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे घटप्रभा खो-यातील ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन्ही नद्यांच्या पूराचे पाणी सामावून घेण्यासाठी हिडकल धरणातजागा उपलब्ध होणार आहे.यावेळी हिडकल धरणाचे अधिकारी माडीवाले, गडहिंग्लज पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बाबुराव पाटोळे व शाखाधिकारी तुषार पवार उपस्थित होते.