सोळांकुर : काळम्मावाडी धरण परिसरात पावसाची जोरदार बँटिग सुरूच असल्याने धरणाच्या सांडव्यावरून ७६०० क्युसेक तर जलविद्युत केंद्रातून १५०० क्युसेक असा एकूण ९१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदीपत्रात वाढविण्यात आला आहे.त्यामुळे नदीपात्र धोक्याच्या बाहेर वाहत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सायंकाळी चारनंतर पावसाचा जोर वाढत असल्याने गेल्या दोन दिवसांपेक्षा पाऊस अधिक आहे. आज धरण परिक्षेत्रात ९१ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, आजअखेर २६८१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. यामुळे धरणाच्या जलाशयाची पातळी ६४२.९४ मीटर असून, पाणीसाठा ६१७.९७२ द. ल. घ. मी. इतका झाला आहे. आज धरणात २१.८२ टीएमसी म्हणजेच ८५.९३ टक्के पाणीसाठा झाला आहे.पुराचे पाणी नदीपात्राबाहेर वाढत असल्याने काठावरील आणखीन शेजारी जमिनीतील भात, ऊस, नाचणी, केळीसारखी पिके ही पाण्याखाली गेली आहेत. गेले पाच दिवस पाणी राहिल्याने पिकांचे उत्पादन घटणार आहे तर काही पिके कुजण्याची शक्यता आहे. पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Kolhapur: काळम्मावाडीतून ९१०० क्युसेकने विसर्ग, धरणात ८५.९३ टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 1:52 PM