कुंभोज : येथील ग्रामपंचायतीने आठवडा बाजारातील विक्रेत्यांना शिस्तीचे धडे दिल्याने आठवड्यातून दोन दिवस बाजारात होणाऱ्या कायमच्या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसह वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कुंभोजला बुधवार तसेच रविवार अशा दोन दिवशी मोठा आठवडा बाजार भरतो. कुंभोजसह परिसरातील पाच गावांतील नागरिकांची दोन्ही दिवशी बाजारात खूप गर्दी होते. पेठ वडगावहून कुंभोज-दानोळी तसेच हातकणंगलेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दीपक चौकात तसेच बाजारात अस्ताव्यस्तपणे ठाण मांडणाऱ्या छोट्या व्यापारी तसेच विक्रेत्यांमुळे ग्राहकांना त्रास होत असे. शिवार विक्रेते तसेच ग्राहकांच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे बाजारात अस्ताव्यस्तपणा निर्माण झाला होता.
तथापि नूतन ग्रामविकास अधिकारी ए. एस. कटारे यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी बाजारातील नियमांचे काटेकोर पालन करण्यास विक्रेत्यांना भाग पाडल्यामुळे ग्राहकांनी मुक्तपणे बाजारहाट करणे सोपे झाले आहे. वाहनधारकांना शिस्त लावल्याने दीपक चौकातील वाहतूक कोंडी दूर तर झालीच; पण आठवडा बाजारास शिस्त लागल्याने नागरिकांतून ग्रामपंचायतीने घेतलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त होत आहे.