कोल्हापूर : रायगड काॅलनी ते पाचगाव रस्त्यावर भाजीपाला विक्रेते सकाळी व सायंकाळी विक्री करतात. रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीला अडथळा व अपघात होत आहेत. त्यामुळे या विक्रेत्यांना पर्यायी जागेतच विक्री करण्यासाठी शिस्त लावावी, अशी मागणी रायगड काॅलनीतील नागरिकांनी महापालिका आयुक्त डाॅ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
रायगड काॅलनीपासून पाचगाव रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला, मसाले विक्रेते बसत आहेत. त्यामुळे मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. यातून अनेकदा भाजी घेण्यासाठी आलेले नागरिकांना दुचाकीची धडक असे अपघात घडत आहेत. याकरिता या भाजी मंडईला पर्यायी जागेत हलवावे. मंडईतील असलेल्या कचऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. तरी महापालिका प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे. यावेळी राहुल चौधरी, चंद्रकांत कांडेकरी, निवास भोसले, शीतल नलावडे, लखन काझी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.